एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत इंदापूर पोलिसांची कारवाई ; भाळेवर गंभीर स्वरूपाचे ८ गुन्हे दाखल..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या व गंभीर स्वरुपाचे आठ गुन्हे दाखल असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील खोरोची येथील राजू उर्फ राजेंद्र महादेव भाळे (वय २७ ) यास पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. राजू भाळे याच्यावर खंडणी, दरोडा, अपहरण, खुनाचा प्रयत्न, मारामारी आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत.
अंकित गोयल यांनी पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सार्वजनिक कायदा सुव्यवस्थेला बाधा ठरतील अशा आरोपींवर एम.पी.डी.ए. कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले होते.
या पार्श्वभूमीवर इंदापूर पोलिसांनी राजेंद्र भाळे याच्यावर या कारवाई करण्यात आली आहे. १६ फेब्रुवारी रोजी पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राजेश देशमुख यांनी या कारवाईचे अंतिम आदेश पारित करत राजू भाळे याला येरवड्यात १ वर्षासाठी कैद ठेवण्याच्या इंदापूर पोलिसांच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला.
त्या अनुषंगाने शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) इंदापूर पोलिसांनी त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. राजू भाळेवर इंदापूर न्यायालयाच्या आवारात खंडणी मागितल्याचा आरोप आहे.त्याने इंदापूर न्यायालयाच्या आवारात धारदार कोयत्यासह एकाला धमकावत खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
धारदार कोयत्यांसह टोळीयुद्ध करण्याच्या इराद्याने न्यायालयाच्या आवारात आलेल्या राजू भाळे आणि मनोज काळभोर या दोघा टोळी प्रमुखांसह त्यांच्या टोळीतील एकूण १६ जणांवर शस्त्र अधिनियम १९५९ अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळेच हे टोळीयुद्ध टळले होते. ही घटना २२ नोव्हेंबर २०२२ रोजी घडली होती.