दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील ओझर्डे गावचे ऊपसरपच पिंट्या ऊर्फ केशव भगवानराव पिसाळ यांच्यावर १४ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. आज झालेल्या सदस्यांच्या बैठकीत 12 विरुद्ध दोन मतांनी हा अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला.
वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांनी सदस्यांना नोटीसा बजावून २० फेब्रुवारी हि तारीख निश्चित केली होती. त्या प्रमाणे तहसीलदार रणजीत भोसले, नायब तहसीलदार वैशाली जायगुडे, ममता भंडारे, गीतांजली गरड, लिपिक मंगेश डंबेलकर, ओझर्डे मंडलाधिकारी नरेंद्र गायकवाड, तलाठी संदीप फाजगे, ग्रामविकास अधिकारी जंगम यांच्या उपस्थितीमध्ये आज ओझर्डे ग्रामपंचायत बैठक झाली.
दुपारी चार वाजता या अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्यांची सभा बोलावून विश्वास आणि अविश्वास प्रस्तावावर मतदान कसे करायचे याची कल्पना दिली. त्याचबरोबर गुप्त मतदानाची पद्धत समजावून सांगितली आणि त्यानुसार मतदान घेतले. यावेळी उपसरपंचावर अविश्वास व्यक्त करणारा ठराव बारा विरुद्ध दोन मतांनी संमत झाला.
वाई तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या ओझर्डे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचावर सदस्यांना आणि सरपंचाला अविश्वास ठराव आणावा लागला याचीच चर्चा तालुक्यात सर्वत्र जास्त झाली होती त्यामुळे आजच्या घटनेकडे सर्वांचे लक्ष होते या सभेस उपसरपंच पिंट्या ऊर्फ केशव भगवानराव पिसाळ उपस्थित नव्हते.