डॉ महेश घोळवे : महान्यूज लाईव्ह
शिरूर येथे नुकतीच राज्यस्तरीय डॉक्टरांची क्रिकेट स्पर्धा “निमा राज्यस्तरीय चषक” पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून डॉक्टरांच्या टीम खेळण्यासाठी दाखल झाल्या. मराठवाडा, विदर्भ, कोकण अशा विविध भागातून चषक जिंकण्याच्या इराद्याने टीम शिरूर मध्ये दाखल झाल्या होत्या. प्रत्येक सामना आयपीएलच्या सामन्यासारखा चित्त थरारक होत होता .
बारामतीच्या डॉक्टरांचा संघ डॉ केशव जायभाय यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेत दाखल झाला होता. बारामती सुपर किंग्स या नावाला साजेल असाच प्रत्येक खेळाडूने खेळ केला. धुवाधार फलंदाजी , भेदक गोलंदाजी व अत्यंत चपळाईचे क्षेत्ररक्षण याच्या जोरावरती बारामतीचा संघ अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला. या संघाच्या तोडीस तोड असणारा शिरूर संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. बारामती व शिरूर मध्ये झालेला सामना इतका चुरशीचा झाला की तो सुपर ओव्हर जाऊन थडकला. सुपर ओव्हर मध्ये बारामतीने शिरूरला मात देत 77 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक जिंकत निमा चषकावरती निमा बारामती सुपर किंग्स चे नाव कोरले.
सामन्यासाठी निमा संघटनेचे राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते. डॉ विनायक टेंभुर्णीकर डॉ सुहास जाधव, डॉ आशुतोष कुलकर्णी या उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांनी सामन्यास हजेरी लावली.