पत्रकार म्हणाले, साहेब, गाडीखेलमध्ये वनविभागात मोठी आग लागलीय.. अग्नीशमक गाडी पाठवावी लागेल.. साहेब म्हणाले.. हरकत नाही.. माझ्याकडे परिपत्रक आहे.. १० हजार भरा, मग गाडी पाठवतो..!
बारामती – महान्यूज लाईव्ह
राज्यात वरच्या स्तरावर तर उदासिनपणा आहेच.. मात्र खालच्या म्हणजे गावागावातल्या भागातही किती उदासिनता आहे…याचा प्रत्यय थेट बारामतीतच आज रात्री आला.. तालुक्यातील गाडीखेल भागात वन विभाग व खासगी ठिकाणी आग लागली.. आग २ किलोमीटर पर्यंत पोचली.. अन जेव्हा एमआयडीसीतील फायर स्टेशनला गाडी पाठविण्यासाठी पत्रकाराने फोन केला, तेव्हा तेथील कर्मचारी, अधिकारी निर्विकारपणे अगोदर १० हजार भरा, मग गाडी पाठवतो म्हणाला..!
बरं ही घटना राज्याच्या दुर्गम भागात घडलेली नाही, ती बारामतीत घटना घडली आहे. थोडक्यात जर भीषण अपघात होऊन व्यक्ती शेवटच्या घटका मोजतोय, तेव्हा अगोदर स्मशानातले लाकडाचे पैसे भरा असे म्हणण्यासारखाच हा अनुभव होता..! अर्थात या अधिकाऱ्याची चूक नाही. जे त्यांच्या वरीष्ठ कार्यालयाने दिलेले असेल, त्याप्रमाणेच हुकूमाची अंमलबजावणी होणार यात शंका नाही.
शिवाय कोणीही सांगेल, गाडी पाठवा, मात्र त्याच्या खर्चाचे काय? पण आजच्या घटनेने ज्याच्या खिशात लागलीच १० हजार नाहीत, त्यांच्यासाठी हे फायर स्टेशन नाही याचा दाखला मिळाला आहे. शिवाय त्याने आग लागली, तरी या कार्यालयाकडे फिरकू नये, अथवा संपर्कही करू नये असाच इशारा यानिमित्ताने मिळाला आहे.
आज संध्याकाळी गाडीखेल वन विभागाच्या हद्दीत मोठी आग लागली. ही आग वन विभागाच्या हद्दीतून गावाच्या भागातही पसरली. त्यामुळे मदतीसाठी काहीजणांनी इतरत्र फोन केले. हे फोन आल्यानंतर बारामतीत वन विभागाच्या हद्दीत घटना घडली आहे, असे पत्रकारांनी सांगितल्यानंतर फायर स्टेशनचा तेथील उपलब्ध प्रभारी अधिकाऱ्यांनी आम्ही निमसरकारी आहोत, आमच्याकडे परिपत्रक आहे, तेव्हा अगोदर १० हजार रुपये भरा. अगोदर पैसे भरावे लागतील. वाटल्यास मी परिपत्रक दाखवतो असे सांगून टाकले.
बारामतीतील न्यूज १८ लोकमतचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांना आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी फायर स्टेशनला फोन केला. तेथे वरील संभाषण झाले. आता २ किलोमीटर परिसरात आग लागली आहे, मात्र जिवीतहानी तेथे होण्याची शक्यता नाही, मात्र पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. पण जर अगदी कोणाच्या जिवावर बेतणारी ही घटना घडली असती तर? अर्थात जर हे निमसरकारी कार्यालय पैशाशिवाय कोठेच येणार नसेल, तर ज्याच्याकडे पैसे नाहीत त्यांनी संपर्क साधू नये, अथवा आग लागण्यापूर्वी प्रत्येकाच्या खिशात १० हजार रुपये यापुढे ठेवावेत.
नगरपरीषदेने दाखवली तत्परता
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नगरपरीषदेची अग्नीशमन गाडी मात्र तातडीने गाडीखेलकडे रवाना झाली. याची माहिती बारामती बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी दिली. अर्थात बारामती नगरपरिषद ही सरकारच्या अनुदानावर चालते, मात्र तिथे मदतीसाठी एका क्षणाचाही विलंब लागला नाही.