विक्रम वरे महान्यूज लाईव्ह
बारामती : दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही वाघळवाडीमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षी किल्ले रत्न दुर्ग येथून ज्योत आणण्यात आली होती. सुमारे २७५ किमी अंतर अवघ्या २८ तासात पार करण्यात आले.
रत्नदुर्ग येथे अनाथ मुलांना श्रीमंत अंबामाता मंडळाच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले. निरा येथे ज्योतीचे आगमन झाल्यानंतर निरा ते सोमेश्वर कारखाना अशी शिवज्योतीची रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता कु. ऋतजा कोल्हापुरे यांचा दांडपट्ट्याचा कार्यक्रम पार पडला.
मंडळाच्या वतीने ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून छत्रपती श्री शिवाजी महाराजांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच २० फेब्रुवारी रोजी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उदघाटन वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सचिन काळे व फौजदार योगेश शेलार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये जवळपास १०२ बाटल्या रक्तदान झाले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास मंडळाच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची मूर्ती मंडळाकडून देण्यात आली. या रक्तदान शिबिरास महिला, ग्रामस्थ व तरुणांनी उत्स्पूर्त प्रतिसाद दिला. आज संध्याकाळी ग्रामस्थांसाठी सरसेनापती हंबीरराव या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचे आयोजन करण्यात आले आहे.