दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यात सध्या घरगुती व शेती पंपाच्या वीज बिल वसुली बरोबरच वीज चोरी करणाऱ्या आकडेबहाद्दरांविरुद्ध महावितरणने जोरदार मोहीम राबविली आहे. राजेगाव येथील १४ व पाटस येथील ५ अशा एकूण १९ जणांवर नुकतीच कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना ८१८४ युनीट चोरी केल्याप्रकरणी १ लाख ८२ हजार ८६१ रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.
महावितरण सांघिक कार्यालयाच्या आदेशावरून ७ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान सर्वत्र कायमस्वरुपी खंडित झालेल्या ग्राहकांची तपासणी व कार्यवाही सुरु आहे. यासाठी महावितरणने स्थानिक पातळीवर पथके तयार केली आहेत व त्यांच्याकडे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वर्गवारीसह इतर वर्गवारीतील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या तपासणीची जबाबदारी ठरवून दिली आहे. तसेच स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष पाहणी करुन तपासणीतील सर्व निरीक्षणे महावितरणच्या ॲपद्वारे ऑनलाईन नोंदवायची आहेत. त्यामुळे पाहणी दरम्यान अनेक वीजचोऱ्याही उघडकीस येत आहेत.
बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री सुनील पावडे यांच्या निर्देशानुसार तसेच अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील व कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड विभागाचे उपकार्यकारी अभियंता महेश धाडवे, सहाय्यक अभियंता जीवन ठोंबरे यांनी राजेगाव येथील १४ व पाटस येथील ५ जणांवर दौंड व यवत येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कामी सहाय्यक अभियंता वैभव पाटील, कनिष्ठ अभियंता अमित धोत्रे तसेच बिलिंग विभाग व जन्मित्र यांचे सहकार्य लाभले.
वीजबिलाचा भरणा करुन सहकार्य करा!
महेश धाडवे, उपकार्यकारी अभियंता दौंड : वीज चोरी करणाऱ्यांवर यापुढेही अशीच जोरदार मोहीम राबवली जाणार आहे. कायमस्वरूपी विद्युत पुरवठा बंद करूनही वीज वापरत असलेले व विजेची थकबाकी असणाऱ्या ग्राहकांनी आपल्या वीजबिलाचा त्वरित भरणा करुन कटू कारवाई टाळावी व महावितरण ला सहकार्य करावे.