राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड: दौंड तालुक्यातील पाटस येथील श्री सिमेंट कंपनी मध्ये आरोग्यास हानिकारक व घातक प्लास्टिक केरकचरा घेऊन आलेला मालवाहतूक ट्रक कानगाव ग्रामस्थांनी सिमेंट कंपनीच्या गेट समोर आडवला. हा ट्रक केरकचरा घेऊन श्री सिमेंट कंपनीमध्ये जाण्यासाठी येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
सिमेंट कंपनी नागरिकांच्या आरोग्येशी व जीवाची खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार असल्याचे स्थानिक लोक सांगत होते. यावेळी श्री सिमेंट कंपनीचे अधिकारी व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. पाटस व कानगाव ग्रामस्थांच्या विरोधाला झुगारुन राजकीय राजाश्रयाने पाटस कानगाव हद्दीत पाटस रेल्वे स्टेशन परिसरात पेन्ना व श्री अशा दोन सिमेंट कंपन्या सुरू झाल्या आहेत.
या कंपन्या सुरू होण्यापूर्वीच वादग्रस्त ठरल्या आहेत. ह्या दोन्ही कंपन्यांना कानगाव पाटस ग्रामस्थांचा सुरुवातीपासून विरोध राहिला आहे. मात्र तालुक्यातील बडया राजकीय नेत्यांना हाताशी धरून व स्थानिक गाव पुढारी अमिषाला बळी पडल्याने या कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. मात्र मागील अनेक दिवसांपासून सिमेंट कंपनीचे अधिकारी व ग्रामस्थ यामध्ये सातत्याने वाद होत आहेत.
पाटस ते कानगाव रस्त्यावर सिमेंट कंपनीपर्यंत सिमेंट वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून सिमेंट पावडर रस्त्यावर पडत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहे. त्यामुळे स्टेशन परिसरातील व ग्रामस्थांनी ही वाहने आडवुन आंदोलनही केले आहेत, मात्र या कंपन्यांना किंचितही फरक पडला नाही. कारण स्थानिक गाव पुढाऱ्यांसह सर्व यंत्रणा मॅनेज झाल्याची चर्चा कानगाव पाटस परिसरात आहे.
सिमेंट रस्त्यावर पडत असल्याचा प्रकार ताजा असतानाच आता या कंपनीमध्ये शहरातील प्लास्टिक घाणीचा दुर्गंधी असलेला तीस टन केरकचरा वाहतूक करणारा मालवाहतूक ट्रक कंपनीच्या गेट समोर शुक्रवारी ( दिनांक १७) नागरिकांना निर्देशास आल्याने सरपंच राहुल चाबुकस्वार, ग्रामस्थ ज्ञानेश्वर शेळके, भानुदास शिंदे, शरद चौधरी, मारुती कोऱ्हाळे, अशोक गवळी आदींनी हा ट्रक कंपनीच्या गेट समोर आडवला.
सिमेंट कंपनी अशा प्रकारचा आरोग्यास घातक व हानिकारक असलेला केरकचरा जाळत असल्याचा प्रकार समोर आला असून ग्रामस्थांनी तसा आरोप केला आहे. दरम्यान, हा ट्रक आमच्याकडे आला नसून आम्ही अशा प्रकारचा कोणताही केरकचरा जाळत नसल्याचा दावा करीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांचा समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीचे अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
कानगावचे गाव कामगार तलाठी व्यवहारे यांनी पंचनामा केला असून, यामध्ये हा ट्रक हा आदर्श भारत इन्वीरो प्रायव्हेट लिमिटेड या नावाची पावती असून तो बेळगाव कर्नाटक येथील दालमिया सिमेंट लिमिटेड या कंपनीत वाहतूक करण्यासाठी जात असल्याचा दावा वाहन चालक व सिमेंट कंपनी केला आहे. मात्र हा प्लास्टिक कचऱ्याने भरलेला ट्रक सिमेंट कंपनीच्या गेट समोर आढळून आल्याचा पंचानामा मध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
याबाबत ग्रामस्थांनी प्रदूषण महामंडळाचे अधिकारी, दौंड तहसीलदार, यवत व पाटस पोलीस यांना कळवले आहे. तसेच भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर शेळके यांनी यवत पोलिसांना या सिमेंट कंपनी व वाहतूक करणाऱ्या ट्रकवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी व ह्या प्रकारची सखोल चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान श्री सिमेंट कंपनीचे अधिकारी मिलिंद घोगरे म्हणाले की, या प्लास्टिक कचरा असलेला ट्रकचा आणि श्री सिमेंट कंपनीचा कसलाही संबंध नाही.असा दावा केला आहे. ट्रक रात्रीत गायब दरम्यान ग्रामस्थांनी श्री सिमेंट कंपनीच्या गेट समोर प्लास्टिक केरकचरासह रंगेहाथ पकडलेला व महसूल विभागाने पंचनामा केलेला ट्रक रात्रीत गायब झाला आहे. या प्रकारावर ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले असून सिमेंट कंपनीची प्रशासनावर किती दहशत आणि दबाव आहे यावरून स्पष्ट होते. या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थ भानुदास शिंदे व ज्ञानेश्वर शेळके यांनी प्रशासनाला दिला आहे.