शिरुर : महान्यूज लाईव्ह
” हर हर महादेव, रामलिंग महाराज कि जय…”, अशा प्रचंड जयघोषात अन ढोल ताशा अन सुमधुर बॅंड, टाळघोषांचा गजर, व हरिनामाचा नामघोष करत शिरूर शहरातुन जुने शिरूर (रामलिंग) चे जागृत देवस्थान श्री रामलिंग महाराज पालखीचे मोठ्या भक्तीभावाने प्रस्थान झाले.
संपुर्ण शहराच्या मुख्य बाजारपेठेतुन निघालेल्या सवाद्य मिरवणुक पालखीचे जुन्या शिरुर(रामलिंग) कडे मार्गक्रमण झाले.शिवजयंती व रामलिंग पालखी सोहळा लगोलग आल्याने संपुर्ण शहर हे भगवेमय झाले होते.
शिरूर तालुक्याचे जागरूक देवस्थान श्री रामलिंग महाराज यात्रा महाशिवरात्री च्या दिवशी जुने शिरूर(रामलिंग) येथील मंदिरात यात्रा भरवली जाते. त्या अगोदरच्या दिवशी या यात्रेच्या पालखीचा मान शिरूर शहराला असतो तर यात्रेचा मान शिरूर परिसरातील पंचक्रोशितील गावांना असतो.
शिरूर शहरातील शिवसेवा मंदिरात रामलिंग देवस्थानचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते महाआरती होऊन पालखी सोहळ्यास दुपारी सुरुवात झाली.यावेळी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, उद्योगपती प्रकाश धारीवाल, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे यांनी हजेरी लावली.
प्रथेप्रमाणे पालखी सोहळ्याचे स्वागत नगरपरिषदेच्या वतीने प्रभारी मुख्याधिकारी चारुदत्त इंगवले यांनी पालखीस पुष्पहार घालून स्वागत केले.यावेळी रामलिंग देवस्थान यांच्या वतीने मानाचा फेटा बांधण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल यांनाही नगरपरिषद यांचे वतीने मानाचा फेटा बांधण्यात आला. व मुख्य पालखी सोहळ्यास शहरातुन दुपारच्या सुमारास सुरुवात झाली.
या पालखी सोहळ्यासाठी रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल, सहसचिव तुळशीराम परदेशी, पोपटराव दसगुडे, गोदाजी घावटे, रावसाहेब घावटे, वाल्मिकराव कुरंदळे, बलदेवसिंग परदेशी, नामदेव घावटे हे ट्रस्टी तसेच सल्लागार जगन्नाथ पाचर्णे, बबनराव कर्डिले हे तसेच शिवसेवा मंडळ ट्रस्टचे विश्वस्त, सर्व माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, पंचक्रोशीचे तरुण कार्यकर्ते यांसह आबालवृद्धांनी पालखीचे व रामलिंग महाराजांचे दर्शन घेतले. या वेळी शिरुर शहरातील व पंचक्रोशीतील भाविक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
या पालखी सोहळ्यात संपूर्ण शिरूर शहरात भगव्या पताका, भगवे झेंडे, प्रत्येक ठिकाणी स्वागतासाठी कमानी उभारल्या होत्या.शहरातील पुणे-नगर रस्त्यावर विद्युत रोशनाई करण्यात आली होती. पालखी मिरवणुकमधे प्रत्येक नागरिकांना भगवे फेटे बांधण्यात आले होते. यामुळे भगवेमय वातावरण तयार झाले होते.
चौका-चौकात प्रभु श्री रामलिंग महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी शिरुर,पारनेर,श्रीगोंदा व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिरूरचे निनाद ढोल पथक, युवा ढोल पथक,आरंभ ढोल पथक, डोने (ता.मावळ) येथील झांज पथक,चाळीसगाव येथील सदगूरू ब्रास बॅड, अमर ब्रासबॅड, हबीब ब्रास बॅड तर आळंदी येथील वारकरी भजनी मंडळ तर पालखी समोर असलेले भालदार चोपदार, डोक्यावर तुलसी घेतेलेल्या महिला व सहभागी अश्व हे आजच्या पालखी मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले.
शहरातील कापड बाजार, अखिल रामआळी, दधिची चौक, मारुती आळी, आझाद सोशल क्लब, सरदार पेठ, हलवाई चौक, सुभाष चौक, सोनार आळी, कुंभारआळी, अजिंक्य तारा मित्र मंडळ, मुम्बई बाजार, डबेनाल मित्र मंडळ यांनी पालखी स्वागतासाठी आकर्षक देखावे व भाविकांचे करिता नाश्ता, सरबत, चहा यांची सोय केली होती. उद्या पहाटे शिरूर शहरातून रामलिंग येथे प्रस्थान होईल रामलिंग मंदिरात पालखी पोहचल्या नंतर महाभिषेक होऊन महाशिवरात्र निमित्त रामलिंग यात्रेस सुरवात होते.