सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
भिगवण येथे दोन दिवसांपूर्वी रस्त्यावर एका महिलेची प्रसूती झाली. साऱ्या आरोग्ययंत्रणेची अब्रू इंदापूरच्या वेशीवर टांगली. मात्र या घटनेची सरकारी आरोग्य खात्याला काहीच लाज नसल्याचे दोन दिवसांत दिसले. महान्यूज ने या प्रकरणाचा पाठपुरावा केला. एवढ्या मुर्दाड झालेल्या यंत्रणेला जाग आणायची, तर वशिलेबाज सरकारी यंत्रणेचा उपयोग नाही. त्यामुळेच अशा उदासिन सरकारी आरोग्य यंत्रणेवर, उपचारास प्रतिसाद न देणाऱ्या खासगी दवाखान्यावर व संपर्क साधूनही वेळेवर सरकारी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही, त्यामुळे या सर्व घटकांवर कठोर कारवाई करावी यासाठी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
खरा मुद्दा हा आहे की, भिगवण येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेबाबत सरकारी आरोग्य खाते मूग गिळून का गप्प आहे? पहिली कारवाई तर भिगवणमधील सरकारी दवाखान्यावर झाली पाहिजे, त्याचबरोबर दारात आलेल्या रुग्णासाठी किमान दरवाजा तरी उघडावा, तेवढीही माणूसकी नसलेल्या खासगी दवाखान्याविरोधात सरकारी यंत्रणेने नेमके काय पाऊल उचलले? स्थानिकांमध्ये गेल्या दोन दिवसांत याची उत्सुकता होती. मात्र कारवाई करण्याची मानसिकता व इच्छाशक्ती सरकारी यंत्रणेकडे नसावी, त्यामुळेच महान्यूज ने त्या कारवाईची वाट पाहण्यापूर्वीच राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला. काल (ता.१६) संध्याकाळी उशीरा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते व ग्राहक पंचायतीचे राज्य पदाधिकारी अॅड. तुषार झेंडे पाटील यांनी दाखल केली.
संबंधित महिला रायगड जिल्ह्यातील होती, कर्नाटक मध्ये पोट भरण्यासाठी राहते, ती आपल्या स्थानिक भागातील नाही, म्हणून तिच्या कळांना, दुःखाला काहीच न्याय नाही? भिगवण येथे दोन दिवसांपूर्वी रस्त्यावर झालेली प्रसूती ही वैद्यकीय व्यवसायाला लांच्छनास्पदच आहे. एखाद्या वैद्यकीय व्यवसायिकाला रात्री, अपरात्री उपचार जमत नसेल, तर वैद्यकीय व्यवसाय बंद करावेत, मात्र फक्त नफ्यासाठी एखादा व्यवसाय मनमानी चालू ठेवायचा असेल, तर अशा डॉक्टरांच्या सनदी रद्द कराव्यात अशी संतप्त मागणी नागरिकांमधून होत होती. महान्यूजच्या प्रसारीत व्हिडिओस देखील लाखो वाचकांनी प्रतिसाद देत अशाच प्रतिक्रया व्यक्त केल्या.
संबंधित गर्भवती महिला ही कर्नाटकमधील आहे, म्हणून तिच्या भावनांना, मानवी हक्कांना काहीच किंमत नाही? ती जिथे उतरली, अथवा बसमधून तिला उतरवले असेल, तिथे योगायोगाने स्थानिक दवाखाना होता, दररोज अशा घटना घडत नसतात, मात्र संबंधित डॉक्टरविरोधात स्थानिकांचीही नेमकी काय कुजबूज आहे याचाही आरोग्य खात्याने आढावा घेतला पाहिजे अशी अपेक्षा संतप्त नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
जर स्थानिकांनी त्या शेजारच्या दवाखान्यातील तज्ज्ञाकडे विचारणा केली नसती, तर ठिक.. मात्र त्या दवाखान्याचे दरवाजे अनेकवेळी ठोठावले, तरीही उघडले गेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याच कर्नाटकच्या महिलेच्या जागी जर स्थानिक बडा राजकीय पदाधिकारी, व्यापारी अथवा अशाच एखाद्या डॉक्टरच्या नातेवाईकांचा रुग्ण असता तर? उघडले असते ना दरवाजे?
कोणीही दखल घेणार नाही, त्याची खंत का बाळगावी अशा मनस्थितीत व गुर्मीत जर असे व्यावसायिक असतील, तर अशा वैद्यकीय व्यवसायिकांबाबत काहीतरी ठोस कार्यवाही करायलाच हवी. त्यामुळेच महान्यूज ने यासाठी स्वतः पाठपुरावा केला. या प्रकरणाची पोलखोल झालीच पाहिजे, दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात स्थानिक पत्रकारांशी काही डॉक्टरांनी चर्चा केली, त्याचे स्वागतच आहे. आम्हीही या घटनेत ज्या महिला डॉक्टरांनी तातडीने मदत केली, माणूसकी दाखवली, त्यांचे जगजाहीर कौतुक केलेच आहे.
मात्र घडलेली घटना पहिलीच नाही, अशा घटना यापूर्वीही घडल्या, जर डॉक्टर कंटाळले असतील, तर त्यांनी इतरांची मदत घेतली पाहिजे. नाहीतरी डॉक्टर एकमेकांची कशी मदत घेतात हे राज्यभरातील रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समधून या देही याची डोळा व्यवस्थित पाहत असतातच. त्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे झालेल्या या तक्रारीचे महान्यूज स्वागतच करतो. त्याची कोणतीही खंत बाळगत नाही आणि हो, या घटनेत दोषी असलेल्या सर्व यंत्रणांवर कारवाई होईपर्यंत हा पाठपुरावा सुरूच राहील.. कारण रस्त्यात जन्मलेल्या त्या बाळालाही आपल्या देशातील परिस्थितीची लहानपणीच जाणीव व्हायला हवी. जेणेकरून आपला जन्म किती या दुनियेत महाग होता हे लक्षात येईल!
तुषार झेंडे पाटील – ही घटना अत्यंत दुःखदायक आहे. या घटनेची माहिती मिळाली आणि मन विषन्न झाले. या घटनेतील मदत करणाऱ्यांशी प्रत्येकाशी बोललो. संबंधित महिलेच्या कुटुंबियांशी देखील संपर्क साधला. जर अशी घटना स्थानिक ठिकाणी घडली असती, तर यातील जबाबदार लोकांना कोणी सोडले असते? यापूर्वी कोरोनाच्या काळातही एक प्रसूती रस्त्यावर झाली होती, त्या घटनेत न्याय मिळवून देईपर्यंत आम्ही पाठपुरावा केला, आम्ही या घटनेतही थांबणार नाही. माणूसकी जिंवत आहे हे दाखवून देऊ आणि भविष्यात कोणाही सामान्य व्यक्तीच्या आयुष्याशी कोणी खेळणार नाही यासाठी काम करीत राहू. भिगवणच्या घटनेबाबत काल रात्री तक्रार दाखल केली आहे, त्याचा पाठपुरावा करू.