पुणे- महान्यूज लाईव्ह
मागील ४० वर्षे कसब्यावर अधिराज्य गाजविणारा नेता आज कसब्यातील केसरीवाड्यात आला खरा.. भाजपने सहानुभूतीचे वातावरण निर्माण केले आणि कसब्यात पुन्हा कमळ फुलविण्याची स्वतःची खात्री पक्की केली.. पण या बैठकीनंतर भाजप अस्वस्थ असलेल्या प्रकृतीतही पक्षनिष्ठा दाखवून देण्यासाठी किती आटापिटा करायला लावतो याची चर्चाही रंगली.
कसबा मतदारसंघात ब्राम्हण समाजाची नाराजी असल्याची चर्चा असल्याने त्यातच हिंदू महासंघाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने वातावरण तंग आहे. हा पारंपारिक बालेकिल्ला असल्याने तो कोणत्याही स्थितीत हातातून जाऊ न देण्यासाठी भाजपने प्रचंड शर्तीचे प्रयत्न चालवले आहेत.
त्यातच आपण आजारपणामुळे प्रचारात भाग घेऊ शकत नाही असे खासदार गिरीश बापट या्ंनी कळवले, मात्र त्यानंतर कसब्यातील खरी वस्तुस्थिती माहिती असलेल्या सर्वेक्षणामुळे भाजपची चिंता वाढली आणि गिरीशभाऊ कसल्याही स्थितीत प्रचारात उतरले पाहिजेत यासाठी धावाधाव सुरू झाली.
अखेर आज सिलेंडर सोबत घेऊन, हातात ऑक्सिमीटर आणि नाकात नळी अशा स्थितीत गिरीश बापट प्रचारसभेसाठी केसरीवाड्यात आले. बोलले नाहीत, मात्र त्यांनी लिहून दिले, तुम्हाला भेटून आनंद झाला. आजारपणामुळे बोलता येत नाही, मात्र सर्वांनी काम करा, उमेदवार नक्की निवडून येईन असे त्यांनी हेमंत रासने यांच्याकडे लिहून दिले.
वास्तविक पाहता आठवड्यातून दोन वेळा डायलेसिस करावे लागते, म्हणून प्रचारात सहभागी होता येत नाही असे बापट यांनी पक्षनेतृत्वाकडे लिहून दिले होते. मात्र आज व्हिलचेअरवरून बापट आले. त्यांच्याकडे पाहून कार्यकर्त्यांना भाजपनेत्यांनी पक्षनिष्ठा कशी असते याचा दाखला दिला आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य फुलवले. या परिस्थितीच्या सहानुभुतीचा भाजपला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.