बारामती : महान्यूज लाईव्ह
पालखी महामार्गाचा ठेकेदार असला, म्हणून काय झाले? सरकारी नियम सर्वांनीच पाळले पाहिजेत. पालखी महामार्गाच्या नावाखाली अवैध गौण खनिज उत्खनन करून त्याची रॉयल्टी न भरणाऱ्या शेळके कन्स्ट्रक्शनच्या महेश श्रीराम सरदार या ठेकेदाराला माहिती अधिकार कार्यकर्त्याने अखेर ४ कोटींचा दंड भरायला लावला. अर्थात यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागला.
यासंदर्भात बारामतीच्या तहसीलदारांनी आदेश दिला असून सोनवडी सुपे येथील गट क्रमांक ३११ मघील ८ हजार ७६ ब्रास मुरूम अवैधपणे उत्खनन केल्याप्रकरणी हा दंड आकारण्यात आला आहे. ही रक्कम सात दिवसांच्या आत भरावयाचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात १८ ऑगस्ट २०२२ रोजी गावकामगार तलाठ्यांनी उंडवडी सुपे येथील गट क्रमांक ३११ मधून अवैध उत्खनन करण्यात आल्याचा अहवाल तहसीलदारांना सादर करण्यात आला होता.
यामध्ये १० हजार ब्रास उत्खनन करण्यात आले, मात्र इतर दोन ठेकेदारांनी याची रॉयल्टी भरली. शेळके कन्स्ट्रक्शनने त्यापैकी काही रॉयल्टी भरली. मात्र तब्बल ८ हजार ब्रास मुरमाची रॉयल्टी भरली नाही, म्हणून या तक्रारी झाल्या होत्या.
माहिती अधिकार महासंघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी वारंवार केलेल्या तक्रारीवरून व त्या तक्रारीचा पाठपुरावा केल्याने हा दंड झाल्याचे सांगितले. तब्बल 10 हजार ब्रास पेक्षा जास्त अवैध मुरूम उत्तखननाचे संबंधित तलाट्या मार्फत पंचनामे करुन घेतले, या संबंधात वारंवार पाठपुरावा केल्यानंतर तहसीलदार यांनी संबंधिताना नोटीसा काढून परवानगी बाबत कागद पत्रे सादर करण्यास सांगितल्यानंतर संबंधित ठेकेदार यांनी परवानग्या न घेताच उत्खनन केल्याचे समोर आले.
दरम्यान अशा प्रकारचे अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करावी व शासनाचा महसूल बुडविणाऱ्या अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार असल्याचे मंगलदास निकाळजे यांनी सांगितले.