दौंड : महान्यूज लाईव्ह
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील चौफुला येथे तेल वाहतूक टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तेल वाहतूक टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक देऊन दुचाकी शंभर मीटरवर फरफडत नेली. या अपघातात नागपूर येथील दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
किस्तुरचंद कन्हैयालाल शर्मा (वय ६५) व गिरधारीलाल शिवकरणजी शर्मा (वय ४७, दोघेही राहणार नागपूर,) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी चालकांची नावे आहेत. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौफुला हद्दीत हॉटेल जोगेश्वरी मिसळच्या समोर गुरुवारी (दि.१६) दुपारी साडेबाराच्या आसपास हा अपघात झाला.
केडगाव येथून तेल वाहतूक टेम्पो हा पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून चौफुलावरून जात असताना हॉटेल जोगेश्वरी मिसळच्या समोर असलेल्या रस्ता क्रॉसिंगवर विरुद्ध दिशेला रस्ता ओलांडताना वरवंड बाजूकडून यवतकडे जाणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. तर ही दुचाकी पुढच्या दोन्ही चाकाखाली वरवंडच्या दिशेने शंभर मीटर अंतरावर असलेल्या गोपीनाथ कार्यालयापर्यंत फरफटत नेली.
या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही नागपूर येथील रहिवाशी असून दोन दिवसापूर्वी ते केडगाव येथे व्यवसायाच्या निमित्ताने आले होते. अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुनील बगाडे, पोलीस नाईक अजित इंगवले तसेच बारामती फाटा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी आदींनी घटनास्थळी धाव घेतली.