राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि पुणे जिल्ह्याच्या प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त यंदा हिंदवी स्वराज्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावर्षी शिवजयंती उत्सवात महाराष्ट्रातील लोकसंस्कृती, ऐतिहासिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हे विविध कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्यानिमित्त जवळपास एक लाख शिवप्रेमी या उत्साहात सहभागी होतील असे नियोजन शासनाने केले आहे.
शिवनेरी किल्ल्यावर जन्मोत्सव सोहळ्याबरोबरच किल्ल्याच्या पायथ्याजवळ जुन्नर शहरात ‘शिवकालीन गाव’ व या वर्षी प्रथमच ‘महाशिव आरती’चे आयोजन करण्यात आले आहे. शिववंदना, स्थानिक पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिबीर, विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा ३९३ वी जयंती आहे. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेले गड-किल्ले जगभरात आकर्षण आहे.
शिवनेरी, रायगड व सिंधुदुर्ग हे महत्वाचे किल्ले आहेत. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हिंदवी स्वराज्य ही भावना आणि आपले वैभव नव्यापिढी पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीविषयी अभिमान व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, पर्यटन, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.