सुरेश मिसाळ – महान्यूज लाईव्ह
बऱ्याचदा एटीएममध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती असतील, तर आपण काहीवेळ थांबतो.. त्यापैकी एखादी व्यक्ती माझ्या एटीएममधून पैसे निघत नाहीत, तुमच्या एटीएममधून निघतात का? पहा असे विचारते.. मग मात्र थांबा.. काही वेळ नक्कीच थांबा… कारण ती तुमची ठरवून केलेली फसवणूकही असू शकते..!
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील विजय भोंग या शेतकऱ्याच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. या शेतकऱ्याला चक्क नकळत एटीएम कार्डची अदलाबदल करून भामट्याने ४५ हजारांचा गंडा घातला आहे.
कष्टाने पै-पै करून जमवलेली रक्कम परस्परच कोणीतरी डोळ्यादेखत न्यावी तसा काहीसा प्रकार घडला आहे. अर्थात एटीएम कार्डमधून २० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येत नसल्याची मर्यादा असलेल्या बॅंकेच्याच एटीएम कार्डमधून अवघ्या काही तासात ४५ हजार रुपये कसे काढले जातात? हा देखील संशयास्पद प्रकार असून बॅंकांचे कर्मचारी यात गुंतलेले आहेत का हे देखील पोलिसांनी तपासले पाहिजे.
या घटनेची पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, विजय भोंग हे कामानिमित्ताने पैसे काढण्यासाठी गावातील इंडीकॅश बॅंकेच्या एटीएममध्ये गेले होते. तेथे त्यांच्या अगोदरच एक व्यक्ती तेथे होती. त्याने माझ्या एटीएम कार्डमधून पैसे निघत नाहीत, बघू तुमच्या कार्डमधून निघतात का? असे म्हणत त्याने भोंग यांच्याकडून काही कळण्याच्या आत कार्ड घेतले.
त्यावर भोंग यांनी मला माझे पैसे काढता येतात, म्हणत त्या व्यक्तीला बाजूला सारले आणि पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भोंग यांच्याही कार्डमधून पैसे निघाले नाहीत. म्हणून भोंग तेथून परतले.
मात्र संध्याकाळी त्यांच्या बॅंकेशी संलग्न असलेल्या मोबाईलवर त्यांच्या खात्यातून तब्बल ४५ हजार रुपये काढल्याचा मेसेज आला आणि भोंग यांना धक्काच बसला. त्यांनी पैसे काढलेच नव्हते, मग हे पैसे कोणी काढले, मग त्यांनी मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी बॅंकेच्या नंबरवर मिस्ड कॉल दिल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ४५ हजार रुपये काढले गेल्याचा मेसेज आला.
त्यानंतर भोंग यांनी एटीएम कार्ड पाहिले असता, त्यांचे कार्ड त्यांच्याकडे नव्हते, तर त्या व्यक्तीने हातचलाखीने त्याच्याकडील कार्ड भोंग यांना दिले होते आणि भोंग यांचे कार्ड त्याने लंपास केले आणि भोंग हे एटीएममधील मशीनमधून पासवर्ड टाकत असताना त्याने पाहिले होते. यासंदर्भात भोंग यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.