राजगुरूनगर – महान्यूज लाईव्ह
दररोजच्या भाकरीचा चंद्र शोधण्याची त्यांची दररोजचीच हातघाई असायची.. कालदेखील त्या १६ जणी पुण्यातील वेगवेगळ्या भागातून एकत्र येऊन खरपुडी फाट्यावरील एका लग्नसोहळ्यात अन्न वाढण्याच्या कंत्राटाच्या कामासाठी निघाल्या होत्या.. अचानक एक भरधाव कार आली.. अन सोबत पाच महिलांचे जीव घेऊन गेली.. बाकीच्याही साऱ्यांना जखमी करून गेली..
पुणे -नाशिक महामार्गावर व्हॅलेंटाईनच्या दिवशी घडलेला हा प्रकार गरीबांच्या पाच घरांना उजाड करून गेला. शिरोली (ता. खेड) येथील महामार्गावर पुण्याकडून येणाऱ्या चारचाकी वाहनाने महिलांच्या या घोळक्याला उडवले आणि पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला. १८ महिला होत्या, उर्वरित सर्व जखमी झाल्या.
सुशीला वामन देढे (वय ७० वर्षे रा. रामटेकडी), इंदुबाई कोंडीबा कांबळे (रा. किरकटवाडी), शोभा राहूल गायकवाड, सुनंदा सटवा गजेशी, राईबाई पिरप्पा वाघमारे (रामटेकडी) अशी या मृत महिलांची नावे असून आणखी तीन महिला अत्यवस्थ आहेत. सारिका देवकर, वैशाली तोत्रे, शोभा शिंदे यांच्यासह इतर महिलांवर खेड तालुक्यातीलच दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी कौशल्याने वाहनचालकाला पकडले.
दरम्यान या घटनेनंतर वाहन दुभाजकावर आदळले, मात्र वाहनचालकाने त्यातूनही वाहन बाहेर काढून पुण्याकडे धूम ठोकली. वाहनचालक पळून गेला, मात्र एमएच १४ ए एस ९०३३ ही चारचाकी कानिफनाथ बबन कड (रा. वाकी ता. खेड) याची असल्याचे पोलिसांनी शोधून काढले आणि कड याचा शोध घेण्यास सुरवात केली.
कड हा पिंपरी फाटा येथे पैसे देण्यासाठी भरधाव वेगाने निघाला होता. अपघातानंतर तो बच्चेवाडी गावात लपून बसला होता. त्याला पोलिसांनी वेगवेगळी पाच पथके तयार करून शोधून काढले व अटक केली.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नवनाथ रानगट, राहुल लाड, भारत भोसले, ज्ञानेश्वर राऊत, अप्पा कड, संतोष मोरे, बाळकृष्ण साबळे, सचिन जतकर, प्रवीण गेंगजे, शेखर भोईर, योगेश भंडारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली