ठाणे – महान्यूज लाईव्ह
ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयाबाहेर प्रचंड तणावाचे वातावरण असून राष्ट्रवादीच्या ज्या कार्यकर्त्यांनी सहायक आयुक्ताला मारहाण केली, त्याला शोधण्यासाठी पोलिस राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोचले, दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्ताची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राष्ट्रवादीमध्येही संतापाचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसांपासून जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीत ठाण्यामध्ये बरेच काही सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असा दावा आव्हाड यांनी केला होता, तर दुसरीकडे बलात्काराचीही केस दाखल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला होता.
आता मात्र आज खऱोखरच अशी घटना घडली आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादीच्या आव्हाड समर्थकांनी ठाणे महापालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण केली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यानंतर ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस राष्ट्रवादी कार्यालयामध्ये पोचले.
अर्थात त्यापूर्वी एक नाट्य घडले. एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाली, ज्यामध्ये ती क्लिप आहेर यांचा असल्याचा दावा करण्यात आला, आहेर हे या ऑडिओ क्लिपमध्ये आव्हाड यांना जिवे मारण्यासंदर्भातील वक्तव्य करीत असल्याचे ऐकायला मिळते, त्याच कारणावरून आहेर यांना मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
दरम्यान पोलिस तेथे पोचल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली, यावेळी कार्यालयाबाहेर एका गाडीमध्ये आव्हाड स्वतः बसले होते.
दरम्यान आव्हाड यांनी पत्रकार परीषदेत सांगितले की, आहेर यानेच ही धमकी दिली असून स्पेनमध्ये असलेल्या माझ्या मुलीला बाबाजी व शार्प शूटर मार्फत मारायचा प्लॅन आखला असल्याची माहिती या ऑडिओ क्लिपमध्ये दिली आहे. ही क्लिप आहेर याचीच आहे. माझ्या कुटुंबियांवर गोळ्या झाडणारा अजून या जगात पैदा व्हायचा आहे, मात्र यापेक्षाही दिवसाला ४० लाख जमा करतो, २० लाख वाटतो असे म्हणणारा हा अधिकारी स्पेनमध्ये शूटर तयार ठेवलेत असे सांगतो, हे काही बोलणे झाले का? आम्ही आजवर बोलत नव्हतो, मात्र आता अती होतेय असे आव्हाड यांनी पत्रकार परीषदेत सांगितले होते.
त्यानंतर काही वेळातच आहेर याच्यावर हल्ला झाला. नौपाडा पोलिस सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांना शोधत आहेत.