दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : तालुक्यातील ओझर्डे गावचे उपसरपंच केशव ऊर्फ पिंट्या पिसाळ यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाल्याने ओझर्डे गावासह परिसरात खळबळ उडाली आहे.
वाई तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या ओझर्डे ग्रामपंचायतीचे उपसरपंच केशव ऊर्फ पिंट्या भगवानराव पिसाळ यांच्यावर सरपंचासह १४ ग्राम पंचायत सदस्यांनी वाईचे तहसीलदार रंजित भोसले यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला.
उपसरपंच हे ग्रामपंचायतीचा कारभार चालवताना कुठल्याही सदस्याला विश्वासात घेत नाहीत असा आरोप सर्व सदस्यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांना उपसरपंच हे पद सर्वानुमते दोन वर्षासाठी दिले होते. त्याची मुदत संपली, त्यामुळे स्वेच्छेने त्यांनी राजीनामा देणे गरजेचे होते, पण दिला नाही, त्यांची समजूत काढण्यासाठी सर्व पक्षीय गावकारभाऱ्यांनी अनेक बैठका घेतल्या. त्यांची समजुत काढण्यासाठी प्रयत्न झाले पण ते निष्फळ ठरले.
राजकीय विश्वासघात केल्याने सरपंच आनंदराव जाधव सदस्य डॉ. विकास पिसाळ, शेखर फरांदे, चंद्रकांत रिठे, सुरेखा क्षीरसागर, शुभांगी पिसाळ, अनिता जायगुडे, सुनीता पवार, हर्षदा निता फाटक, सुनंदा शिंदे, रेखा कदम, डॉ. सत्यजित नेमाडे, अतुल कदम या १४ जणांनी वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांचेकडे
अविश्वास ठराव दाखल केला आहे .
तहसीलदार रंजित भोसले भोसले यांनी हा अविश्वास ठराव दाखल करुन घेतला आहे. त्यावर मतदान
घेण्यासाठी २० फेब्रुवारी हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. या दिवशी सरपंच व सदस्यांनी दुपारी चार वाजता उपस्थित राहण्यासाठी नोटीसा बजावल्या आहेत.