बारामती : महान्यूज लाईव्ह
रस्ता अडवून या रस्त्याने जायचे नाही; अन्यथा बघून घेईन, अशा शब्दांत धमकावून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या खटल्यातून आरोपी महादेव कुलाळ व इतर तिघांची बारामती जिल्हा व सत्र न्यालयालयाचे सत्र न्यायाधीश आर. के. देशपांडे यांनी नुकतीच निर्दोष मुक्तता केली.
बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे १५ फेब्रुवारी २०१६ रोजी हा गुन्हा घडला होता. फिर्यादी हे त्यांच्या टेम्पोमध्ये सरपण घेऊन घराकडे येत असताना आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवून जातीवरून शिवीगाळ केली, तसेच या रस्त्याने जायचे नाही. येथून गेला तर तुझ्याकडे बघून घेईन, असे म्हणून धमकी दिली व रस्त्यात जाण्यास आडकाठी केली. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरुन महादेव कुलाळ व इतर तिघांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रस्त्याचा पुरावा सादर करण्यास सरकारी पक्ष अपयशी
हा खटला बारामती जिल्हा व सत्र न्यालयालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यात दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच तपास करणारे तत्कालीन पोलीस उप अधीक्षक बापू बांगर यांची साक्ष नोंदविली होती. तर आरोपीतर्फे अॅड. विशाल बर्गे यांनी कामकाज पाहिले. गुन्हा घडलेल्या ठिकाणी रस्ता होता का, अथवा त्याची सरकार दरबारी नोंद होती का तसेच त्याच्या वापराचा हक्क असल्याबाबतचा पुरेसा पुरावा सरकारी पक्ष न्यालयालयात सिद्ध करू शकले नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.
राजकीय वैमनस्यातून त्रास देण्यासाठी दिली फिर्याद
२०१५ साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत फिर्यादीची नातेवाईक महिला व साक्षीदार यांची पत्नी उभा होती. त्यांच्या विरोधात आरोपीने पॅनल टाकले होते. त्यात आरोपीची पत्नी निवडून आली होती. त्यानंतर आरोपीचे राजकीय प्राबल्य वाढत असल्याच्या रागातून फिर्यादी यांनी केवळ त्रास देण्यासाठी खोटी फिर्याद दिल्याचे अॅड. बर्गे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
दरम्यान, फिर्यादी आणि साक्षीदार यांच्या साक्षीत असलेली तफावत, तसेच आरोपीला या खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा अॅड. बर्गे यांनी केलेला युक्तिवाद, त्याबाबत सादर केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन करून न्या. देशपांडे यांनी आरोपीसह अन्य तिघांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.