न्याय न मिळाल्यास कुटूंबासह जीवन संपवण्याचा इशारा.!!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : जमीन विकत द्यावी या मागणीसाठी गावातील काही नागरिकांनी बळाचा वापर करून ऊस पीकातील ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊसतोड मजुरांना दमदाटी करत ऊसतोड बंद पाडली. परिवारातील सदस्यांना शिवीगाळ करत, जीवे मारण्याची धमकी देत दहशत निर्माण करणा-यांपासून सुटका मिळावी व तात्काळ ऊस तोडून नेण्यात यावा म्हणून हवालदिल झालेल्या शंकर काळे या शेतकऱ्याने न्याय मिळावा म्हणून खुप धडपड केली. पोलीस प्रशासनाकडेही मदत मागितली पण सारे व्यर्थ. अखेर तुटलेला ऊस डोळ्यासमक्ष वाळत चाललेला पाहून व ऊसतोड मजूर भितीपोटी येत नसल्याचे पाहून हतबल झालेल्या शेतकऱ्याने पत्रकारांना अन्यायाचा पाढा वाचून दाखवला. हे सांगताना तो धाय मोकलून ढसाढसा रडला. न्याय न मिळाल्यास कुटुंबासह जीवन संपवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
शंकर कृष्णा काळे (रा.रेडणी,ता.इंदापूर,जि.पुणे) असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निरवांगी, ता. इंदापूर, जि. पुणे या गावच्या हद्दीत गट नं. ८४८ एकूण क्षेत्र ७ हे. ६७ आर. असून ती जमीन तीघा भावंडाच्या व माझ्या मालकीची आहे. या जमीनीवर इतर कोणाचा कसल्या प्रकारचा कुठल्याच नातेसंबंधाचा हक्क व संबंध नाही.
जमीन विकत द्यावी म्हणून या मागणीसाठी वरील क्षेत्रापैकी ४ एकर २० गुंठे या क्षेत्रामध्ये ऊस असून त्यातील काही ऊस शेतातामध्ये आजतागायत ऊस तोडून पडलेला आहे. रेडणी गावातील माजी सरपंचांसह इतर लोकांनी माझ्या शेतात ऊस तोडणीसाठी आलेल्या ऊस मजुरांना ऊस तोडू नका म्हणून दमदाटी करत, धमकावत व तसेच मला माझ्या परिवारातील महिलांना शिवीगाळ करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे सध्या रानातील ऊस तोडणी थांबलेली आहे.
कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत, हे अस्मानी संकट उभे राहिले असल्याचे सांगत ऊसाची तोड करु देण्यासाठी याचना केली आहे. जमीन मागणा-या गावगुंडांना अधिकाऱ्यांचा व नेत्यांचा वरदहस्त आहे. त्यामुळे आमच्या सारख्या गरीब शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचे शंकर काळे यांनी सांगितले.
वालचंदनगर पोलीसांनी दखल घेतली नाही, असा आरोपही काळे यांनी केला आहे. त्यातच दमदाटी करणाऱ्या लोकांना बड्या नेत्यांचा वरदहस्त असल्याने आम्हा गरीबांना वाली उरला नसल्याचे काळे यांनी सांगितले. गावगुंडांमुळे आमचा प्रपंच उध्वस्त होणार असून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी करत न्याय न मिळाल्यास इंदापूर तहसील कार्यालयासमोर कुटुंबातील सर्व विषप्राशन करून जीवन संपवण्याचा निर्णय शंकर कृष्णा काळे यांनी दिला आहे.