औरंगाबाद – महान्यूज लाईव्ह
सर्वांचे लक्ष लागून राहीलेल्या व १५ वर्षांपासून बंद पडलेल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत प्रशांत बंब यांची एकहाती सत्ता मतदारांनी संपुष्टात आणली. ठाकरे गटाच्या शिवशाही पॅनेलने एकहाती सत्ता या कारखान्यावर आणली.
राजकारणातील नाराजीचा आगडोंब व सध्याच्या राज्यातील सुरू असलेल्या वर्तमान राजकीय स्थितीचाही फटका बंब यांना या निवडणूकीत बसल्याचे दिसून येत आहे. खुद्द बंब स्वतःचीही उमेदवारी वाचवू शकले नाहीत. लासूर स्टेशन गटातून कारखान्याचे माजी अध्यक्ष कृष्णा पाटील डोणगावकर यांनी प्रशांत बंब यांचा पराभव केला.
ठाकरे गटाच्या कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिवशाही पॅनेलने सुरवातीला मतमोजणीत घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. कारखान्याच्या कायगाव, लासूर, पुरी, अंबेलोहळ या सर्वच गटात शिवशाही पॅनेलला प्रचंड मताधिक्य मिळाले.
या निवडणूकीत १४ हजार मतदारांपैकी ७ हजार ६०० मतदारांनी मतदान केले. हा पराभव आमदार बंब यांच्यासाठी फार मोठा धक्का मानला जात आहे.