दौलतराव पिसाळ – महान्यूज लाईव्ह
वाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एस. जी. नंदीमठ यांनी बाललैंगिक अत्याचार
प्रकरणाच्या खटल्यात पवन रामनारायण चौरसीया यास दोषी मानून ३ महिने साधी कैद व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
ही माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे. दरम्यान वाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या कामकाजातील ही पहिलीच शिक्षा असल्याने तिला त्या दृष्टीने महत्वही आहे.
या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की, सिध्दनाथवाडी येथील एका गल्लीत राहणाऱ्या पवन चौरसीया याने राहत्या घराशेजारी खेळणाऱ्या काही लहान मुलींकडे पाहून अश्लिल हावभाव केले व या मुलींना लज्जास्पद वाटेल असे वर्तन केले. या मुलींपैकी दोन मुलींनी आपल्या आईवडीलांना याची माहिती देताच तेथील पालकांमध्ये संतापाची लाट उसळली.
यानंतर पवन याच्याविरोधात वाई पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली, त्यावरून पोलिसांनी पवन चौरसिया याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालिन फौजदार राजेंद्र कदम यांनी या घटनेचा तपास केला होता.
याची सुनावणी न्यायाधिश श्री. नंदीमठ यांच्यासमोर चालली. यामध्ये सरकारी पक्ष व बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने वरीलप्रमाणे शिक्षा ठोठावली. राजेंद्र कदम यांनी केलेल्या तपासाबाबत परिसरात कौतुक केले जात आहे.