दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : वाई पाचगणी रस्त्यावरील दांडेघर गावच्या हद्दीतील हॉटेल झोस्टेल समोर मुंबईहून पाचगणी महाबळेश्वर पाहण्यासाठी निघालेल्या पर्यंटकांच्या धावत्या कारने अचानक पेट घेतला. या घटनेत कार जळून खाक झाली.
या घटनेची माहिती पाचगणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक आर.जे.माने यांना समजताच त्यांनी सहकारी फौजदार वार. एस. महामुलकर, हवालदार रवींद्र कदम, उमेश लोखंडे, वैभव भिलारे, किर्तीकुमार कदम आदींसह घटनास्थळावर दाखल झाले.
कार जळत असल्याचे पाहताच त्यांनी तातडीने पाचगणी नगरपालिकेचा अग्नीशामक बंब मागवून आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत कार जळून खाक झाली.. या घटनेमुळे वाई कडुन पाचगणी व महाबळेश्वरकडे ये जा करणाऱ्या वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती.
दरम्यान ही आग विझवून उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. या घटनेची खबर कार (एम.एच.२ डी.डल्बु .६९९७) चालक अरुण निलकंठ मंडल (रा. मुंबई) यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात दिली आहे. कारमध्ये शॉटसर्किट होऊन कारला आग लागल्याचे त्यांनी सांगितले. या कारमध्ये चालकासह पर्यटक पती पत्नी बसलेले होते. या तिघांचेही नशीब बलवत्तर असल्यानेच सर्वजण सुखरूप कारमधून बाहेर पडले. याचा अधिक तपास पाचगणी पोलिस करीत आहेत .