भिगवण : महान्यूज लाईव्ह
सारा देश अमृतकालच्या गप्पा मारतो मात्र सर्वसामान्यांच्या नशिबात अजूनही अमृतकाल नाही. कारण काल रात्री भिगवणमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेची रस्त्यावरच प्रसूती करण्याची वेळ आली. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे घडलेली ही घटना साऱ्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन टाकणारी ठरली आहे.
काल रात्री कर्नाटककडे पुण्याहून एका खाजगी ट्रॅव्हल्स मधून गर्भवती महिला आणि तिचे नातेवाईक प्रवास करत होते. मात्र या गर्भवती महिलेला अचानक प्रसूतीच्या कळा आल्या आणि त्या असह्य कळा पाहून त्यांनी गाडी थांबवण्याची विनंती केली. मात्र खाजगी बसच्या चालकाने भिगवण नजीक गाडी आली असता सागर हॉटेल समोरील एका हॉस्पिटल समोर गाडी थांबवली आणि तिथेच या महिलेला आणि त्याचे नातेवाईकांना सोडून बस चालक निघून गेला.
या महिलेची अवस्था पाहून स्थानिकांनी तिला मदत करण्याचा प्रयत्न केला. ज्या हॉस्पिटल समोर या महिलेला उतरवले होते, त्या हॉस्पिटलच्या दरवाजा उघडण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला मात्र या हॉस्पिटलला दवाखाना उघडलाच नाही.
अखेर तिच्या कळा आणखी वाढत गेल्या, मग सरकारी यंत्रणेकडे देखील दाद मागितली, सरकारी रुग्णवाहिका मिळते का त्याचीही त्याचाही प्रयत्न स्थानिकांनी केला. मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तक्रारवाडीतील केतन वाघ हे या नातेवाईकांच्या मदतीला धावले.
त्यांनी देखील प्रयत्न केला आणि शेवटी लाईफ लाईन केअर हॉस्पिटल मधील डॉक्टर योगिता भोसले यांना त्यांनी संपर्क साधताच त्या अवघ्या पाच मिनिटात तिथे पोहोचल्या. तोपर्यंत या महिलेची प्रसूती झाली होती. मात्र त्यानंतरच्या सर्व सोपस्कार डॉक्टर योगिता भोसले यांनी व्यवस्थित रित्या पार पाडले आणि महिला आणि बाळ सुखरूप झाल्यानंतर ते बाळ आणि महिला घेऊन लाईफ लाईन केअर हॉस्पिटल मध्ये पोहोचल्या.
रात्री घडलेली ही घटना तशी पाहिली तर अनेकांच्या वाट्याला येऊ शकते. आडवाटेने किंवा ज्या ठिकाणी कोणतीही ओळख नाही अशा ठिकाणी घडणाऱ्या अशा घटना अनेकांच्या स्मरणात कायमच्या राहतात, मात्र ज्या दवाखान्याने, ज्या डॉक्टरने त्याचा दवाखानाच उघडला नाही, त्याच्यावरती काय कारवाई होणार हा प्रश्न मात्र काल रात्री सर्वांनाच अनुचरित करून गेला.