नायक बारामतीच्या समृद्धीचे
विक्रम शिवाजीराव जगताप आणि घनश्याम केळकर
पणदऱ्याच्या सगळ्या राजकारणाचा केंद्रबिंदू असतो माळेगावचा सहकारी साखर कारखाना. पण या कारखान्यात पणदऱ्याला नेहमी सापत्नभावाची वागणूक मिळते अशी पणदरेकरांची भावना असते. खरे तर माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात माळेगाव आणि पणदरे ही मोठी गावे. पण कारखान्याच्या चेअरमनपदाचा चेंडू मात्र माळेगाव आणि सांगवी असाच नेहमी फिरत राहतो. तो पणदऱ्याकडे कधी येतच नाही. कारखान्याच्या राजकारणातील पवारगट पणदऱ्यावर अन्याय करतो असे म्हणत विरोधक पंदारकरांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांच्याही काळात चेअरमनपदासाठी पणदऱ्याचा विचार कधी होताना दिसत नाही.
पणदऱ्याला फक्त एकदाच माळेगाव कारखान्याचे चेअरमनपद मिळाले ते श्रीरंग आण्णां जगताप यांच्या रुपाने. श्रीरंगआण्णा हे नेहमीच शरद पवारांचे समर्थक राहिले. मात्र त्यांचे चिरंजीव प्रतापराव उर्फ पताभाऊ यांचे संपुर्ण राजकारण मात्र पवार गटाच्या विरोधात होते. त्याची सुरुवात १९९२ साली झाली. या वर्षी कारखान्याच्या संचालकपदासाठी पताभाऊंचे नाव होते, मात्र तिकीट मात्र त्यांचे चुलतबंधू भगतआबा जगताप यांना मिळाले. यावेळी वरिष्ठ नेत्यांनी पताभाऊंची समजूत काढली. मात्र याचवर्षीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही संधी नाकारण्यात आली. तेव्हापासून पताभाऊंनी जो संघर्षाचा मार्ग स्विकारला तो शेवटपर्यंत सोडला नाही.
९२ सालच्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत पताभाऊंना कॉंग्रेसकडून उमेदवारीची अपेक्षा होती. पण त्यावेळी पताभाऊंना तिकीट न मिळता केशव वकिलांना तिकीट दिले गेले. त्यावेळी झेड.पी. चा पणदरे – सांगवी असा गट होता. ही निवडणूक मोठी चूरशीची झाली. या निवडणूकीत ११०० मतांनी पताभाऊ हरले. या निवडणूकीत विरोधात पणदरे परिसरातील उमेदवार असतानाही पताभाऊंना या परिसरातून १४०० मतांचे लीड मिळाले. मात्र सांगवी, कांबळेश्वर, शिरवलीमधून मिळालेल्या मताधिक्क्यामुळे या निवडणूकीत पताभाऊंना पराभव पत्करावा लागला. ही निवडणूक पताभाऊंनी अपक्ष म्हणून लढविली होती. या निवडणूकीत पराभव झाला असला तरी याच निवडणूकीने त्यांनी स्वतःची ताकदही दाखवून दिली.
त्याकाळात जिल्हा परिषदेमध्ये स्विकृत सदस्य घेण्याची पद्धत होती. या स्विकृत सदस्याबाबत जे घडले ते म्हणजे राजकारणाची नागमोडी वाट कशी असते हे दाखविणारे होते. त्यावेळी पताभाऊंच्या काही कार्यकर्त्यांची अजितदादांबरोबर भेट झाली. मला पताभाऊ पुन्हा कॉंग्रेसमध्ये हवे आहेत, त्यांच्याशी बोलून त्यांचे काय म्हणणे आहे ते मला सांगा, असे अजितदादांनी या कार्यकर्त्यांना सांगितले. या कार्यकर्त्यांनी पताभाऊंची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषद सदस्यपद नाकारल्याने हा वाद सुरु झाला आहे, त्यामुळे जिल्हा परिषदेला सदस्यपद द्या अशी मागणी पुढे ठेवली. संबंधित कार्यकर्त्यांनी हे अजितदादांच्या कानावर घातले. अजितदादांनी ते तातडीने मान्य केले आणि पताभाऊंना जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी घेऊ असा शब्दही दिला. मात्र ज्यावेळी स्विकृत सदस्यांची नावे जाहीर झाली, त्यावेळी पताभाऊंचे त्यात नाव नव्हते. या कार्यकर्त्यांनी पुन्हा अजितदादांची भेट घेतली आणि याबाबत विचारणा केली. ‘ अहो, तुमच्याच पणदऱ्यातील लोकांनी मला सांगितले की, पताभाऊ म्हणत होते की स्विकृत सदस्य होऊन मागच्या दाराने जिल्हा परिषदेला जायला मी काय बांगड्या भरल्या आहेत का ‘ असे अजितदादांनी या कार्यकर्त्यांना सांगितले. यामुळे पताभाऊंऐवजी दुसऱ्या कार्यकर्त्याला आम्ही संधी दिल्याचे अजितदादांनी सांगितले.
या नंतर पवारगट आणि पताभाऊंमधील दुरावा वाढतच गेला. तो आणखी वाढावा यासाठीही पणदऱ्यातील स्थानिक विरोधकांनीही हातभार लावला. त्यानंतर १९९५ साली पताभाऊंनी विधानसभेच्या निवडणूकीत थेट अजित पवारांविरोधातच लढण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी चंद्ररावआण्णा त्यांना भेटण्यासाठी आले. मी अजित पवारांच्या विरोधात लढणार आहे. आपण एकत्र राहून त्यांना हरवू, यासाठी तुम्ही अर्ज मागे घ्या असे आण्णांनी पताभाऊंना सांगितले. कार्यकर्त्यांचा विरोध असूनही पताभाऊंनी आण्णांच्या म्हणण्यानूसार अर्ज मागे घेतला. मात्र पुढे चंद्ररावआण्णांनीही या निवडणूकीतून माघार घेतली.
यानंतर आली १९९७ सालची माळेगाव कारखान्याची निवडणूक. या निवडणूकीने इतिहास घडवला. चंद्ररावआण्णांच्या नेतृत्वात सगळ्या पवारविरोधकांना एकत्र येऊन ही निवडणूक लढवली. एकेकाळी एकमेकांविरोधात लढलेले अॅड. केशवराव जगताप आणि पताभाऊ यावेळी एकत्र आले. बारामती तालुक्यात पवारांना फार कमी वेळा पराभव पत्करावा लागला आहे, त्यातील एक म्हणजे ही निवडणूक. या निवडणूकीत पवारविरोधकांना मोठा विजय मिळाला आणि पताभाऊ हे माळेगाव कारखान्याचे संचालक झाले. यातील काही काळ त्यांना डिस्टिलरी चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या वयाच्या ४७ व्या वर्षी ते संचालक झाले, त्यानंतर त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे वयाच्या ७० व्या वर्षापर्यंत ते कारखान्याच्या संचालकपदावर राहिले.
यानंतर पवारविरोधकांमधील एक प्रमुख नाव म्हणजे पताभाऊ हे समीकरण घट्ट झाले. या काळात कारखान्यातील सत्तासमीकरणे बदलत राहिली. कधी पवारगटाची तर कधी पवार विरोधकांची सत्ता राहिली, मात्र पताभाऊ प्रत्येक निवडणूकीत निवडून येत राहिले. याचे महत्वाचे कारण पताभाऊंनी गट-तट, जातपात असा भेदभाव न करता काम घेऊन त्यांना भेटायला येईल त्या प्रत्येकाचे काम केले. कारखान्याच्या कोणत्याही सभासदांचे काम अडता कामा नये अशी सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्याबद्दल त्यांची प्रामाणिक तळमळ होती. एका निवडणूकीच्या वेळी त्यांना आजारपणामुळे प्रचारात अडचणी येत होत्या. त्यावेळी मतदार त्यांना घरी येऊन आमच्याकडे प्रचाराला येण्याची गरज नाही. आमचे मत तुम्हालाच आहे. तुम्ही विश्रांती घ्या असे सांगत असत. कारखान्याचा ऊसउत्पादक शेतकरी आणि पताभाऊंमधील नाते इतके घट्ट झालेले होते.
यामुळेच कारखान्यातील दोन्ही गटही पताभाऊंनी आपल्याकडे असावे यासाठी सतत प्रयत्न करत. अजित पवारांनीही पताभाऊंनी आपल्या पॅनेलमध्ये यावे यासाठी प्रयत्न केले. पण पताभाऊंनी चंद्ररावआण्णांची साथ कधीच सोडली नाही. पताभाऊ हे फार कमी बोलत, परंतू ते पवारांच्या विरोधात बोलतात असे स्थानिक राजकारणातील त्यांचे विरोधक अजितदादांना सांगत रहात. त्यातूनही हा दूरावा वाढतच गेला.
चंद्ररावआण्णांची कारखान्यावर सत्ता असताना तांत्रिक कारणामुळे त्यांना चेअरमनपद सोडावे लागले. त्यावेळी पताभाऊंना चेअरमनपदाची संधी होती. पण डमी चेअरमन म्हणून काम करावे लागले असते, कोणताही स्वतंत्र निर्णय घेता आला नसता. पताभाऊंच्या स्वभावाला हे पटणारे नव्हते. त्यामुळे त्यावेळी त्यांनी या पदासाठी फारसा आग्रह धरला नाही.
पणदरे परिसरात पताभाऊंच्या शब्दाला किंमत होती. गावात अगदी घरातील किरकोळ वादंग असला तरी त्यावर मार्ग काढण्यासाठी पताभाऊंना बोलावले जायचे. तेदेखील तिथे बसून, चर्चा करून ही भांडणे मिटवत असत. त्यांच्या वागण्यात कधीच नेतेपदाचा अहंकार दिसला नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसालाही सहजपणे त्यांच्यापर्यंत जाऊन आपणे म्हणणे मांडता येत असे. याच कारणामुळे त्यांचा समाजात तळागाळापर्यंत संवाद होता. मात्र दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर घरांशीही त्यांचा संबंध होता. राज्याच्या राजकारणातील असे अनेक हेवीवेट नेते ज्यावेळी बारामतीत येत त्यावेळी पतभाऊंच्या घरी येऊन त्यांना भेटून जात असत.
बारामतीत पवारांचा विरोधक म्हणून उभे राहणे हे फार धाडसाचे काम आहे. येथील प्रशासनावर, सहकारी संस्थांवर आणि राजकीय पदांवर त्यांचे पुर्ण वर्चस्व आहे. त्यामुळे विरोधकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. पताभाऊंनी मात्र हे धाडस त्यांच्या सगळ्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत दाखवले. त्यांचे निधन झाले त्यावेळीही ते कारखान्याचे पवारविरोधी गटाकडूनचे संचालक होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव बाबाराजे यांना चंद्ररावआण्णांनी संचालकपदावर घेतले.
मात्र पताभाऊंच्या निधनानंतर त्यांच्या घराने अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. १९९७ नंतर २०१८ मधली मधली माळेगाव कारखान्याची निवडणूक होती, ज्यामध्ये पताभाऊंच्या घरातील कोणीही निवडणूकीच्या स्पर्धेत नव्हते. मात्र यावेळी पताभाऊंचे चिरंजीव मंगेश जगताप यांनी अजित पवारांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता. तिकीट मिळाले नाही तरी त्यांनी मनापासून पवारगटाचा प्रचार केला. ही बहुतेक पहिलीच वेळ होती, ज्यावेळी पणदऱ्यातील कोणताही प्रमुख नेता पवारविरोधकांसोबत नव्हता. याचा परिणाम अर्थातच निवडणूकीत दिसला. ही निवडणूकही अटीतटीची झाली, पण पवारविरोधकांना पराभव पत्करावा लागला. जर पणदऱ्याची साथ त्यांना असती तर निश्चितच त्यांचे पारडे जड झाले असते.
सलग २१ वर्षे पताभाऊ माळेगावच्या संचालकमंडळात राहिले, त्यापूर्वी त्यांचे वडिल श्रीरंगआण्णाही अनेक वर्षे या संचालकमंडळात होते. २०१८ मध्ये मात्र जे संचालकमंडळ निवडून आले, त्यात श्रीरंगआण्णा आणि पताभाऊंच्या घरातील कोणीही नव्हते. ती कसर पताभाऊंचे चिरंजीव मंगेश जगताप यांनी भरून काढली. त्यांना अजित पवारांनी कारखान्याच्या स्विकृत संचालकपदी घेतले आणि ही परंपरा अबाधित राहिली. आजच्या घडीला माळेगाव कारखान्याचे माजी चेअरमन श्रीरंग आण्णा जगताप यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे.
पताभाऊंच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही मुलांपैकी मंगेश जगताप यांनी सार्वजनिक जीवनात त्यांचा वारसा चालविण्यास सुरुवात केली तर बाबाराजे यांनी शेतीत लक्ष घातले. मंगेश यांनी पताभाऊ असतानाच सामाजिक कामासाठीची आपली आवड जोपासण्यास सुरुवात केली होती. २००७ मध्ये शिवराय प्रतिष्ठानची स्थापना केली. प्रतिष्ठानच्या वतीने पणदरे येथे शिवराय व्याख्यानमालेची सुरुवात करून त्यांनी आपले काम सुरु केले. या व्याख्यानमालेत अनेक मान्यवरांचे विचार पणदरेकरांना ऐकायला मिळाले. या परिसरातील पहिली बैलगाडा शर्यतही त्यांनीच भरवली. रणजितसिंह मोहते पाटील, आमदार संग्राम जगताप, प्रा. नितीन बानगुडे पाटील निशिगंधा वाड यासारखे राजकीय आणि कला क्षेत्रातील दिग्गज या बैलगाडा शर्यतीसाठी पणदऱ्यात आले होते. पणदरे परिसरातून शासनाच्या सेवेत गेलेल्या परिसरातील १४ आजी माजी अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याचेही काम त्यांनी केले. परिसरातून उत्तम काम केलेल्या गुणवंताचा पणदरे भुषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यास सुरुवात केली. पहिला पणदरे भूषण पुरस्कार उद्योजक गणपत दादा जगताप यांना प्रदान करण्यात आला. शिवराय प्रतिष्ठानने पणदरे गावात एच बी चेकअपसाठी २००८ साली कॅम्प घेतला., स्मशानभुमीमध्ये वृक्षारोपण केले, शिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून झाडांना कट्टे बांधले. ग्रामपंचायतीची सत्ता २०१२ साली मंगेश पाटील जगताप यांच्या नेतृत्वाखालील सिद्देश्र्वर पॅनलकडे आली, त्यावेळी ओबीसी पुरुष असे आरक्षण असतानाही गावचे सरपंच म्हणून महिलेला काम करण्याची संधी दिली.
वडिलांचे सगळी राजकीय कारकिर्द पवारांच्या विरोधात गेली असली तरी मंगेश जगतापांनी जाणीवपूर्वक आपल्या आजोबांचा रस्ता पकडला. पवारांच्या विरोधात जाऊनही फायदा नाही तर नुकसानच झाल्याची त्यांची भावना होती. चंद्ररावआण्णांशी यांनी याबाबत सविस्तर चर्चा करून आपले मत अगदी स्पष्टपणे त्यांना सांगितले. अजित पवारांचीही भेट घेतली आणि त्यानंतर अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. श्रीरंगआण्णांच्या घरात गावची पाटीलकी होती. यामुळे अगदी पूर्वीपासूनच लोकसेवेचा वारसा होता. आता पाटीलकी राहिली नसली तरी लोकसेवेचा हा वारसा श्रीरंगआण्णा आणि पताभाऊंनी मात्र पुढे चालवला होता. आता त्यांच्या पुढच्या पिढीत पताभाऊंचे दोन्ही चिरंजीव बाबाराजे आणि मंगेश हा वारसा पुढे चालवताना दिसत आहेत.
( या लेखाबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया आपण मंगेश जगताप यांना ७३८५०००००५ या क्रमांकावर कळवू शकता. या सदरात लेख प्रसिद्ध करण्यासाठी ९८८१०९८१३८ या क्रमांकावर संपर्क साधावा )