विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
मुलाने शिकून लागलीच नोकरीला लागावं. त्याचं करीअर बनावं ही प्रत्येक पालकाचीच इच्छा असते.. बारामती तालुक्यात काऱ्हाटी आता नव्याने करिअरचे केंद्र बनू लागले आहे. कारण काऱ्हाटीत पहिलाच रोजगाराचा मेळावा झाला आणि करिअर घडविणाऱ्यांचं पाऊणशतक पूर्ण झालं..
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यापासून या संस्थेच्या कामकाजात दररोज नव्याने बदल होत आहेत. ही संस्था सामान्य कुटुंबांच्या घरात करिअरचे नवे पर्व घेऊन आल्याचे या घटनेतून दिसून आले.
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथील कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत असणाऱ्या वेगवेगळ्या व्यवसाय अभ्यासक्रमातील प्रशिक्षणर्थींकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या रोजगार मेळाव्यामध्ये पियाजो व्हेईकल्स प्रा. लि. बारामती, झेनीथ सर्वेअर,मुंबई, अहमदाबाद येथील टोरेंट ग्रुप आणि स्वराज एंटरप्राइजेस, बारामती या कंपन्यांनी सहभाग नोंदवला.
संस्थेचे प्रशासन अधिकारी व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. विकास निर्मल यांनी दिलेल्या माहितीनुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील आपले प्रशिक्षण पूर्ण करीत असलेल्या फिटर , इलेक्ट्रिशन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक , सर्वेअर तसेच इंटेरियर डिझाईनिंग अँड डेकोरेशन व वेल्डर या व्यवसाय अभ्यासक्रमातील ९३ प्रशिक्षणार्थींनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवला. त्यापैकी ७५ प्रशिक्षणार्थींची नोकरी साठी निवड करण्यात आली.
ग्रामीण भागातील तरुणांना कौशल्यपूर्ण व रोजगारक्षम प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनवण्याच्या हेतूने संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या संकल्पनेतून सन २०२० मध्ये आय टी आय ची स्थापना झाली. या संस्थेमधून प्रशिक्षण पूर्ण करीत असलेली संस्थेची पहिली बॅच बाहेर पडण्याअगोदरच त्या प्रशिक्षणार्थीना वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये नोकरीची संधी मिळाल्यामुळे पालकांनीही समाधान व्यक्त केले.
या रोजगार मेळाव्याकरिता संस्थेच्या संचालिका सौ. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष दशरथ धुमाळ, सचिव प्रफुल्ल तावरे, खजिनदार सुभाष सोमाणी आदींनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याचे नियोजन आय.टी.आय चे अधीक्षक श्री. महेश चांदगुडे व प्रशिक्षण अधिकारी श्री. अनिकेत सूर्यवंशी यांनी केले.