नाशिक : महान्यूज लाईव्ह
जिल्ह्यातील सिन्नर येथील पंचाळे गावच्या हद्दीत ही घटना घडली असून संत बाळूमामांच्या १२ ते १५ मेंढ्या कारच्या धडकेने मृत झाल्या. या घटनेने परिसरात शोककळा पसरली व भक्तांनी या कारचालकावर कारवाई करण्यासाठी शहा-पंचाळे रस्त्यावर धरणे धरले.
शनिवारी (ता.११) संध्याकाळी उशीराच्या सुमारास ही घटना घडली. बाळूमामांच्या पालखीचा मुक्काम या भागात होता, या भागातून शहा-पंचाळे रस्त्याने हा कळप निघाला असताना भरधाव वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कारने अचानक कळपात शिरून अनेक मेंढ्या चिरडल्या.
या वेळी कळपात जवळपास दोनशेहून अधिक मेंढ्या होत्या. त्यातील १० ते १५ मेंढ्या जागीच ठार झाल्या. काही मेंढ्या गंभीर जखमी झाल्या. एका शिवारातून दुसऱ्या शिवारात मेंढ्या जात असताना रस्त्याने या कळपात कार शिरली. गावचे पोलिस पाटील शांताराम कोकाटे यांनी यासंदर्भात लागलीच पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.