दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : वाई शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलींनी एकत्र येऊन छेडछाड करणाऱ्या मुलांच्या टोळक्यांना न घाबरता त्यांच्याशी दोन हात करण्याची हिंमत ठेवल्यास अशा टोळ्या आपोआप नष्ट होतील असे मत वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी शीतल जानवे खराडे यांनी व्यक्त केले.
सध्या छेडछाडीचे वाढते प्रमाण पाहता या सडकछाप टोळक्यांना वठणीवर आणण्यासाठी मुलींची प्रतिकारशक्ती आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी सातारा पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा पोलिसप्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींच्या संरक्षणासाठी वाईच्या डिवायएसपी कार्यालयात महिला पोलिसांचा समावेश असलेले निर्भया पथक तयार करण्यात आले आहे. त्याचा फायदा मुलींनी आवश्य घ्यावा असे आवाहन वाईच्या डिवायएसपी शितल जानवे खराडे यांनी केले आहे
त्या वाई येथील कन्या शाळेत बोलत होत्या. या वेळी निर्भया पथकाच्या महिला हवालदार हिरा धुळे, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, सर्व शिक्षका उपस्थित होत्या .
शीतल जानवे खराडे पुढे म्हणाल्या, वाई तालुक्यातील शाळा व महाविद्यालयात तीन ते साडेतीन हजार मुली विविध विषयांवर शिक्षण घेत आहेत. मुली ह्या शिक्षणासाठी नेहमीच एकाग्र असतात. पण दुर्दैवाने वर्गातीलच काही उनाडकी
करणारी मुले एकत्रित येवुन आपल्या बहिणी सारख्या असणाऱ्या मुलींची छेडछाड करतात तर मुलींच्या काही मैत्रिणीच मुलींचे मोबाईल नंबर त्या उनाड मुलांना पोहच करतात. त्याचा गैरफायदा घेऊन ते टोळके मुलींच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून तिचे जगणे मुश्किल करतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता मुलींनी देखील एकत्र यावे आणि स्वतःच्या स्वसंरक्षनाची देखील जबाबदारी घ्यावी. त्यांच्या पाठीशी निर्भया पथक आहे.