नानाची टांग..
आदरणीय श्री..श्री.. परमपूज्य, आदरणीय.. श्रध्देय दादाजी..
पत्र लिहण्यास कारण की, कालच तुमचा सरकारने दिलेला हुकूम मिळाला.. हुकमाची तालिम करणारच आहोत. पर जरा शंका होती, म्हणून म्हणलं पत्रच लिहावं..
दादाजी, तुम्हाला तर माहितीच आहे की, (म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला भेटेल, तेव्हा तेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलेलंच आहे की..) आम्ही लहानपणापासूनच कट्टर हिंदू बरं का..! भगवा रंग दिसला की, आमची छाती फुगणार म्हणजे फुगणारच..!
लहानपणी आम्हीसुध्दा मंथनाला जायचो बरं का.. पण कितीबी केलं, तरी गावातलं आमचं दैवत म्हंजे आमचं अण्णा, साहेब घसा ओरडून ओरडून.. खिशाला झळ लावून पेट्रोल- डिझेल टाकून गावगन्ना हिंडत राहीले.. पक्ष वाढवत राहीले.. पण जवा आमच्या लक्षात आलं की, तिथं आमचे पंत हेच सगळ्यांचे प्रमुख संत आहेत, तवा आमच्या लक्षात समदा डिफरन्स आला.. मग आमी समदा नाद सोडला.. अन आमचं पाय आमच्या घराला एकदाचे लागले..
पण हा, हिंदूवादी तर आम्ही कायमच आहोत. घरात पूजाअर्चा कायम असतेच.. फळ, भाज्या सुध्दा खरेदी करताना त्यो अगोदर हिंदू हाय का? भाजीवाली असेल, तर कुंकु आहे का?.. नसेल तर अगोदर टिकली लाव मग मी भाजी घेणार अशी अट टाकतो.. आपण लय कट्टर हाये, त्यात काय म्हणजे कायबी खंड नाही. हेबी तुम्हाला माहितीच आहे..
तर सांगायचा मुद्दा म्हणजे काल परवा तुम्ही जे सांगितलंय, ते ऐकून एकदम कानात शिसं ओतावं तसं झालं बगा.. आता त्या व्हॅलेंटाईनवाल्यांना एकदाचा चांगलाच धडा बसणार बघा.. माझं म्हणाल, तर आपल्याकडं चार गायी.. दोन बैल.. पाच गोऱ्हे आहेत.. कारण ज्याच्या घरी गाय, त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय असतात, याच विचाराचे आम्ही.. कसं?
तर दादाजी.. सगळी तयारी झालीय.. एरवी आम्ही काठ्या काढून ठेवायचो.. व्हॅंलेटाईनवाले सापडले की, मुका मार द्यायला.. ( राग तर असा यायचा की, पाठीमागच्या गल्लीतली मंगी, एवढा ट्राय करूनसुध्दा आपल्याला लाईन देत नाही.. अन ज्या गल्लीशी दुश्मनी.. त्या गल्लीतल्या पिंक्याबरोबर.. ह्या.. आपल्याला चालायचंच नायी.. कसं चालणार हो?.. मग आपणसुध्दा पिंक्याला दरवर्षी ठोकतोच..) पण यावर्षी एक सकारात्मक निर्णय होईल.. कोणता? अहो, गोमातेचा सन्मान..!
व्हयं, व्हयं दादाजी, यंदा व्हॅलेंटाईनच्या दिशी गायला मिठी मारणार..मारणार म्हणजे मारणारच.. ठरलं..! मग मी त्याची सुरवात करायची ठरवली.. रंगीत तालमीसाठी गोठ्यात गेलो.. दादाजी.. दररोज पहाटे पाच वाजता कितीबी थंडी असू द्या, शेणकूट काढायला आपण गोठ्यात असतूच.. आमच्या लक्ष्मीला.. म्हंजे आमच्या काळ्या गाईला मिठी मारायला लगेचच गेलो..
दादाजी.. खोटं सांगत नाही.. आजवर गोठ्यात कधीच लक्ष्मीनं आपल्याला परकं मानलं नाही.. पण आज मिठी मारताच लक्ष्मीचा पाय असा माझ्या पायावर पडला ना.. हत्तीपाय कसा असतो याची आठवण झाली हो.. एवढा कळवळून गेलोय.. बरं हे एक प्रकरण दुखरं असतानाच मी अचानक गायला मिठी मारलेली पाहून आमच्या कारभारणीला तर वेगळाच संशय आला..
ह्याचं काहीतरी बाहेर भानगड असल्याचा एवढा कांगावा केला म्हणून सांगू.. मग तिनं सगळ्या वस्तीला गोळा केलं.. सगळे येऊन मलाच बोलू लागले.. मग त्यातही लाज, शरम न बाळगता मी लगेचच मुद्दा बाहेर काढला.. गोमातेला मिठी मारायची.. सगळ्यांना सांगितलं..
पण आमच्या वस्तीवरचं गण्या लयीच बेरकं आहे दादाजी..! त्यानं एक आडवा प्रश्न विचारला.. म्हणलं तर आडवा, म्हणलं तर विचार करण्यासारखा.. ते म्हणालं.. दररोज ज्यांना गायीची माहिती नाही..कधी गायीच्या मुताचा वास घेतला नाही.. कधी शेण काढलं नाही.. गोठा ज्यांच्या नशीबात नाही.. फ्लॅटमध्ये राहून कुत्र्या, मांजरांशी ज्यांची दररोजची गट्टी असते.. त्यांना गाय कळाली नाही आणि त्यांनी बैलालाच मिठी मारली तर?
बरं जरी गायीला मिठी मारली, अन ती गाय भटकी असेल तर? तिनं जर नीट शहाणपणानं मिठी मारू दिली तर ठिक! आणि दुसरी गोष्ट म्हणजे बैलाचं काय करायचं? दादाजी, जरा तेवढंच अडचणीचं वाटतंय.. तुम्ही सगळ्या प्रश्नावर तोडगा काढतासा.. येवढ्या प्रश्नावर जरा मार्गदर्शन करा.. म्हंजे मी मोकळा. आणि हो, दुसरं एक महत्वाचं म्हणजे… सरकारलाबी माझ्यासारखीच गायीनं लाथ मारली का काय? आदेश मागे घेतलाय म्हणे?