इंदापूर – महान्यूज लाईव्ह
अनेक बड्या व्यक्तींना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न झाल्याच्या अनेक घटना इतर राज्यात घडल्या आहेत. पुण्यात तर दोन तरुणांनी या प्रकरणात आत्महत्याच केली आहे. आता थेट राष्ट्रवादीच्या आमदारालाच सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न झाला असून पोलिसांनी या प्रकरणी राजस्थानातून रिझवान खान या भामट्याला पकडले आहे.
यशवंत माने हे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आहेत. जानेवारी महिन्यात नेमका हा प्रकार घडला. त्यांच्या मोबाईलवर एक अश्लिल मेसेज आला व त्यांना व्हिडीओ कॉल करून भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करून त्यांना धमकी देण्यात आली व एक लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.
माने यांनी तातडीने यासंदर्भात सायबर पोलिसांकडे संपर्क साधला, तेव्हा माने यांना आलेला कॉल हा राजस्थानातून आलेला असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा सायबर पोलिसांनी राजस्थान गाठून तेथून रिझवान खानला अटक केली, तेव्हा रिझवान एकटाच नाही, तर राजस्थानातील त्या गावात सारे गावच हा धंदा करत असल्याचे निदर्शनास आले. रिझवान खान यानेही आतापर्यंत ८० जणांना अशा पध्दतीने धमकावले असल्याचे निष्पन्न झाले आहे.