सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
नगरपरिषदेने गाळेधारकांवर गाळ्यांचे भाडे वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. व्याज दंड भरण्यासाठी प्रचंड दबाव आणत गाळे बंद करण्याची धमकी दिली जात आहे. यामुळे व्यापारी व्यावसायिक गाळेधारक अस्वस्थ झाले आहेत. यामुळे इंदापूर शहर नागरी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. नगर परिषदेच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी व ठोस भूमिका घेण्यासाठी आज ( शनिवार ) संघर्ष समितीच्या वतीने इंदापूर शहरातील सर्व मालमत्ताधारक, व्यापारी, व्याजग्रस्त, शस्तीग्रस्त व कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
इंदापूर नगरपालिका बेकायदेशीरपणे जप्ती लिलावाच्या नोटिसा देऊन नागरिकांना व्याज दंड, दंड व्याज भरण्यासाठी दबाव आणत आहे व नोटिसा देत आहे असा आरोप इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला आहे. तसेच नगरपालिकेच्या गाळेधारकांना पोलिस आणून गाळे सील करू अशी भीती घालत आहे, या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी व 26 जानेवारी रोजी संघर्ष समितीने केलेल्या उपोषणाच्या वेळी नगरपालिकेने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून घेण्यासाठी आज शनिवारी (दिनांक 11 ) सायंकाळी सात वाजता इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी बैठक आयोजित केली आहे.