राजेंद्र झेंडे
दौंड : महान्युज लाईव्ह
पाटस – बारामती संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर दौंड तालुक्यातील रोटी येथे रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात चिंकारा हरणाचा मृत्यू झाला आहे. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे व वेळेत उपचार न मिळाल्याने या हरणाचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
पाटस ते बारामती संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे काम रोटी हद्दीत सध्या सुरू आहे. वन विभागाच्या हद्दीतही काही ठिकाणी हे काम चालू आहे. त्यातच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वन हद्दीतील झाडाच्या गवताच्या पालापाचाळाना काही दिवसापूर्वी आगी लावल्याने या ठिकाणी परिसरात राख पसरली आहे. तसेच या आगीत अनेक मोठी झाडे जळाली आहेत. परिणामी वन प्राण्यांना झाडांकडे बसण्यासाठी सुरक्षित अशी जागा नाही. तसेच अन्न पाण्याच्या शोधासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यातच वन विभागाच्या मधोमध पाटस ते बारामती संत तुकाराम महाराज पालखी मार्ग गेला आहे. त्यामुळे वन प्राण्यांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. शुक्रवारी ( दि.१०) सकाळी साडेनऊ दहाच्या आसपास रस्ता ओलांडताना चिंकारा मादी हरणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने. धुमाळ वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत हरिण पडले. घटनास्थळी असलेल्या प्रथमदर्शनी ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दूरध्वनी याबाबत माहिती दिली. मात्र दीड दोन तासाच्या नंतर संबंधित वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत मादी हरणाचा उपचाराअभावी तडफडून मृत्यु झाला. दरम्यान , हे हरीण मादी असून तिची प्रसुती जवळ आली होती. वन विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच या हरणाचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रथमदर्शक ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान याबाबत वनपाल शितल खेंटके यांच्यासी संपर्क होऊ शकला नाही.