ब्रिझा वाहनातील चार प्रवाशांचा धुमाकूळ.. टोलचे चार लेनचे बुम बाजूला करून 25 वाहने विना टोल सोडून दिली.. त्या चौघांवर कारवाई करण्याची मागणी..
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : इंदापूर तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावरील सरडेवाडी टोल नाक्यावर चार चाकी वाहनाचा टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी दोन मागितला असता त्या वाहनातील युवकांनी टोल न देता टोल नाक्यावरच दादागिरी केली. टोल कर्मचाऱ्यांसह मॅनेजरला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत टोलचे चार लेनचे बुम उघडून तब्बल पंचवीस वाहने विना टोल सोडून दिली.
गोंधळ घालणाऱ्या व मारण्याची धमकी देणाऱ्या युवकांबद्दल सरडेवाडी टोल नाका कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना झाली आहे. हा प्रकार सोमवारी ( ६ फेब्रुवारी रोजी) रात्री ११ वाजून ३० मिनिटांच्या दरम्यान घडला आहे.
या प्रकरणी टोल प्रशासनाचे मॅनेजर हरिश्चंद्र बुधा जाधव यांनी सरडेवाडी टोलवर धुमाकूळ घालणाऱ्या वरवडे, तालुका माढा, जिल्हा – सोलापूर) येथील तीन व एका अनोळखी इसम अशा चौघांविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सोमवारी (दिनांक ६ फेब्रुवारी) रात्री साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान सरडेवाडी टोलवर सोलापूरहून आलेल्या ब्रिझा गाडी (क्रमांक MH45 AD 9429 ) लेन नंबर 11 वर आली. यावेळी ब्रिझा वाहनाच्या चालकाने आपण टोल देणार नसल्याचे सांगत शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली.
यावेळी टोल कर्मचाऱ्यांनी टोल द्यावा लागेल असे म्हणताच चालक व इतर तीन जणांनी गाडीतून उतरून शिवीगाळ, दमदाटी करून लेन क्रमांक 9,10,11,12 याचे बुम वर करुन या प्रवासी युवकांनी चार लेनचे बुम बाजूला करून 25 वाहने विना टोल सोडून 3990 रुपयांचे नुकसान केले. कर्मचाऱ्यांच्या माहिती वरुन व ओळखीचा आधार घेऊन चार जणांविरोधात मॅनेजर हरिश्चंद्र जाधव यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. टोल नाक्यावरील सीसीटिव्ही फुटेजवरून आता इंदापूर पोलीस संबंधितांचा शोध घेत आहेत.