सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यातील उजनीच्या तक्रारवाडी गावानजीक पाणलोट क्षेत्रात आज एक विचित्र मृतदेह पोलिसांना आढळून आला. ज्यामध्ये अत्यंत क्रूरपणे आणि थंड डोक्याने खून करून त्याच्या शरीराचे पाच तुकडे करण्यात आलेले पोलिसांना दिसून आले. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
शरीराचे पाच तुकडे करून प्लस्टिक पिशवीत भरलेल्या विवस्त्र अवस्थेतील अनोळखी युवकाचे अवयव भिगवण पोलिसांना तक्रारवाडी गावानजीक उजनी पाणलोट क्षेत्रात आढळून आले आहेत.
दरम्यान या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत भिगवण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, भिगवण चे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, फौजदार रुपेश कदम यांनी घटनास्थळी भेट दिली.
याबाबत दिलीप पवार यांनी अधिक माहिती दिली. आज गुरुवारी तक्रारवाडी गावामध्ये उजनीच्या पाणलोट क्षेत्रात मनगटाच्या पोटरीवर टॅटू असलेला परंतु मुंडक्यासहित शरीराचे पाच तुकडे केलेला मृतदेह पोलिसांना आढळला.
साधारणपणे खून केलेल्या व्यक्तीचे वय 30 ते 35 वर्षाच्या दरम्यान असून हे पुरुष जातीचे प्रेत आहे अशी माहिती दिलीप पवार यांनी दिली. खून केलेल्या व्यक्तीचे हात पाय धडावेगळे केलेले असून यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ते ठेवलेले होते.