बारामती – महान्यूज लाईव्ह
बारामती शहरामध्ये व परिसरात बांधकाम परवानगी घेताना व भोगवटा प्रमाणपत्र मिळवताना अग्नीशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळविण्याची कटकट आता दूर होणार आहे. आता पुण्यात नाही, तर बारामतीतच हे प्रमाणपत्र मिळणार आहे. बारामतीच्या क्रेडाईने यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या सुविधेबद्दल क्रेडाईचे अध्यक्ष सुरेंद्र भोईटे यांनी शासनाचे आभार मानले आहेत.
आतापर्यंत पुणे पीएमआरडीए कडून हे प्रमाणपत्र घ्यावे लागत होते. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करणे आवश्यक असल्याने ते प्रमाणपत्र मिळण्यासाठी विलंबही व्हायचा व साहजिकच सरकारी काम सहा महिने थांब अशा उक्तीचा प्रत्यय वेळोवेळी बांधकाम व्यवसायिकांना येत होता.
मात्र आता राज्य शासनाने बारामती नगरपरीषदेकडे सहायक अग्नीशमन स्थानक पर्यवेक्षक म्हणून पद्मनाभ कुल्लरवार यांची नियुक्ती केली आहे. त्यांना ८ फेब्रुवारी २०२३ रोजी तात्पुरते अथवा अंतिम ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे तसेच अग्नीशमन यंत्रणेचे लेखापरीक्षण करण्याचे अधिकार दिलेले आहेत.
ही सुविधा बारामतीतच उपलब्ध झाल्याने बांधकाम व्यवसायिकांबरोबरच नागरिकांचाही खर्च व वेळ वाचणार आहे. या निर्णयाचे क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष प्रफुल्ल तावरे, बारामती क्रेडाईचे उपाध्यक्ष जगदिश जगताप, सचिव राहूल खाटमोडे, सहसचिव राजेंद्र खराडे, खजिनदार भागवत चौधर, युवा समन्वयक अक्षय मेहता, महिला समन्वयक प्राजक्ता भोईटे यांनी स्वागत केले आहे.