फक्त गौतमी पाटीलच नव्हे, तर अश्लील नृत्य करणाऱ्या कोणत्याही कलाकाराला राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बंदी..!
मुंबई – महान्यूज लाईव्ह
साताऱ्याच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर आता गौतमी पाटील हिच्या अश्लिल नृत्याच्या प्रकारावर राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही निर्णय घेत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात लावणीच्या नावाखाली अश्लिल नृत्य करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमाला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाची बैठक झाली. या बैठकीत लावणी नृत्यांगणा, अभिनेत्री व राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाच्या ठाणे विभागाच्या जिल्हाध्यक्षा मेघा घाडगे यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
राष्ट्रवादीच्याच नेत्यांकडून आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये गौतमी पाटीलला आमंत्रित केले जाते व तेथे तेथे अश्लील नृत्य होते हे मेघा घाडगे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर राज्यभरात कोठेही पक्षाच्या कार्यक्रमात किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम आयोजित करताना गौतमी पाटीलच काय, कोणत्याही अश्लिल नृत्य करणाऱ्या कलाकारांना बोलावू नये अशा सूचना पवार यांनी दिल्या.
या बैठकीनंतर खुद्द अजित पवार यांनीच पत्रकारांना याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील लोकसंस्कृतीला बाधा आणणाऱ्या प्रत्येक गोष्टी टाळल्या पाहिजेत. सांस्कृतिक कार्यक्रम हे कुटुंबियांसह सर्वांना पाहता यावेत असे असावेत. मी प्रसंगी विधानसभेच्या अधिवेशनातही हा मुद्दा मांडणार असून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा टिकली पाहिजे, त्यात कोठेही अश्लीलता असू नये, कोणी चूकत असेल तर त्यांना वेळीच आवरले पाहिजे असे अजितदादा म्हणाले.