महाबळेश्वर पाचगणी : रस्त्यामध्ये जागोजागी खड्डेच खड्डे! पर्यटकांसह वाहनचालक झाले हैराण!
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा! या सातारा जिल्ह्याचा राज्यासाठी असलेला आत्मा म्हणजे पाचगणी आणि महाबळेश्वर! राज्याला सर्वाधिक पर्यटनाचा लाभ मिळवून देणारे हे दोन तालुके मात्र सध्या दयनीय अवस्थेत आहेत. कारण महाबळेश्वर ते पाचगणी या १० किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दयनीय अवस्था होऊन फुट दिड फुटांचे खड्डे पडले आहेत.
या रस्त्यावर जागोजागी मोठमोठी खडी रस्त्यावर विखुरल्याने पर्यटक आणी वाहनचालकांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. ही दोन ठिकाणी जशी पर्यटनासाठी व थंड हवेसाठी प्रसिद्ध आहेत, तशीच ती देशातील इतिहासाला वेगळी दिशा देणाऱ्या प्रतापगडाच्या शेजारी आहेत, म्हणजेच ती ऐतिहासिक देखील आहेत आणि आता तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळगावाच्या नजीक आहेत.
पाचगणी फक्त थंड हवेच्या ठिकाणासाठीच प्रसिद्ध नाही, तर देशभरातील विद्यार्थी या ठिकाणी येऊन शिक्षण घेतात हे देखील पाचगणीचे वैशिष्ट्य आहे. मात्र अशा या महत्त्वाच्या ठिकाणचे रस्ते पावसाळ्याच्या काळात हातघाईची लढाई करतात. त्यानंतरच्या काळात हे रस्ते पूर्वत व्हायला हवेत मात्र सध्या या रस्त्याची अवस्था बिकट आहे.
वाहनचालकांना आपली वाहने अगदी आदळआपट करून न्यावी लागतात. यातून फक्त वाहनांची अवस्था गैरसोयीची बनत नसून प्रवाशांना देखील प्रचंड मनस्ताप आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र याकडे कोणाचेच लक्ष नाही हे दुर्दैव आहे.
सार्वजनिक बांधकाम व्यवसाय खात्याच्या अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षाचा हा परिणाम असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे, मात्र याची दखल सरकारने तातडीने घ्यावी अशी अपेक्षा देखील स्थानिक नागरिकांची आहे. अर्थात सध्या राज्याचा राज्यकारभार हाकणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जन्मगाव या ठिकाणी असल्याने ते तातडीने लक्ष देतील आणि या रस्त्यांची दुरावस्था संपेल अशी अपेक्षा येथील स्थानिक नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे रस्त्याचा हा दैवदुर्विलास कधी संपतो याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.