बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत आल्यानंतर भाजपचे नेते पवारांचे कौतुक करतात आणि त्याचा आम्हाला त्रास होतो असे बऱ्याचदा भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते खाजगीत व जाहीरदेखील बोलतात. आमदार राहुल कुल यांनीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यातही हा मुद्दा मांडला होता. मात्र आता भाजपचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीच या प्रश्नाला छेद देत चांगल्या कामाचं कौतुक करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे, ती खंडित होता कामा नये असे सांगत द्वेषाच्या राजकीय नीतीला छेद दिला आहे.
आज बारामतीत सुधीर मुनगंटीवार यांनी एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टची पाहणी केली. चंद्रपूर मध्ये त्यांना आगामी काळात कृषी प्रदर्शन आयोजित करायचे आहे. त्याचबरोबर कृषी तंत्रज्ञानाशी संबंधित अधिकाधिक आधुनिक बाबी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे. या हेतूनेच त्यांनी आज बारामतीला भेट दिली होती.
त्यांनी बारामतीतील एग्रीकल्चरल डेव्हलपमेंटच्या देशी गोवंश सुधार प्रकल्पाला भेट दिली. त्यानंतर बारामतीच्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शिक्षण संस्थांना व कृषी महाविद्यालयासह डॉक्टर आप्पासाहेब पवार रिसर्च इन्स्टिट्यूट, अटल इंक्युबेशन सेंटर आणि त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राला त्यांनी भेट दिली.
यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मोदीजी जेव्हा बारामतीत आले, तेव्हा त्यांनी येथील कामाचे कौतुक केले होते. अर्थात एखादे उत्तम काम असेल, तर त्याची कौतुक करण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे. मी सुद्धा एखादे चांगले काम करतो, तेव्हा हे जे विरोधक आहेत, तेही कौतुक करतात. ही महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. ती खंडित होता कामा नये.
हे खरे आहे की, चुकीच्या बाजूचे कोणीही समर्थन करू नये . जी बाजू चुकीची आहे, ज्यामध्ये अन्याय अत्याचाराचा भाव आहे. त्याचे समर्थन देखील करता कामा नये, मात्र एखाद्या पक्षात जर एखादे चांगले असेल तर त्याचे समर्थनही करण्यास मागे पुढे पाहू नये अशा शब्दात मुनगंटीवार यांनी थेट आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.
दरम्यान काल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक झाली या घटने संदर्भात मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, आदित्य ठाकरे हल्ला मला माहित नाही. पण शिवसेनेची पोलिसांच्या बाबतीत भूमिका राहिली आहे की, पोलीस सत्य बोलतात. आता काय भूमिका आहे ते त्यांना विचारून ठरवू.
विधान परिषद शिक्षक मतदार संघात भाजपचा पाच पैकी चार ठिकाणी पराभव झाला या संदर्भात मुनगंटीवार म्हणाले, भाजपचे नेहमी मंथन चालूच असतं. भाजप हा पक्ष विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही अशा भूमिकेतून चालतो. आम्ही इतके वर्ष सत्तेच्या बाहेर होतो, मात्र जनतेचा आवाज बुलंद करत होतो. संसदीय आयुधांचा वापर करत होतो.
शेवटी आम्हाला जी शिकवणूक आहे ती, सत्तेसाठी काही पण; असे नाही, तर सत्यासाठी काही पण अशी आहे. आम्ही निवडणूक जिंकलो की हरलो याच्यापुरतं आमचं काम चालत नाही. आमचे लक्ष हे देशातील गरिबांच्या आयुष्यातील अंधार बाजूला करण्याचे आहे. चार निवडणुका हरल्या म्हणजे काहीतरी गडबड झाली असे समजायचे कारण नाही ठीक आहे आमचा पराभव झाला आम्ही त्याचे समर्थन नक्की करू आणि भविष्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही उभारी घेऊ.
बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे यासंदर्भात त्यांची भाजपशी जवळीक होते का या पत्रकारांच्या प्रश्नावर मुनगंटीवार म्हणाले, त्यांच्या अंतर्गत बाबीमध्ये मी का लक्ष घालू? मात्र त्या पक्षाची एकमेकांचे पाय ओढण्याची परंपरा आहे. भाजपची जवळक असल्याचे वाटत नाही. त्यांच्या पक्षामध्ये ही मोठी परंपरा आहे. एकमेकांचे पाय ओढण्याची! त्या परंपरेचे जे जे पाईक आहेत ते ते पुढे जातील. त्याच्यासाठी आम्ही काय बोलायची कारण नाही.