राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पारगाव येथील भिमा नदीपात्रात पारनेर तालुक्यातील सात जणांचे मृतदेह आणून टाकल्याची घटना घडली. त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. हे खून चुलतभावंडांनीच केल्याचे निष्पन्नही झाले. एवढेच नाही, तर एका अल्पवयीन मुलासह तब्बल सात जणांनी हे खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. आता या खूनाच्या खटल्यासाठी पोलिस यंत्रणा राज्यातील विशेष सरकारी वकीलांची मदत घेणार आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी यासंदर्भात एक निवेदन प्रसिध्दीस दिले असून दौंड तालुक्यातील सामूहिक हत्याकांडाचा शास्त्रोक्त पध्दतीने तपास करण्यात आल्याचा दावा पुणे ग्रामीण पोलिसांनी केला आहे.
यातील वापरण्यात आलेले वाहन व हत्यारे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेतील आरोपींनी खुनाची कबुली दिली असून आवश्यक ते नमुने फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने गोळा करण्यात आलेले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल धस या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
सहा आरोपींबरोबर एक विधीसंघर्षित बालकाचाही या गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे. आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून एका आरोपीचा तपास परराज्यात केला जात आहे,. त्याच्या शोधासाठी पथक पाठविण्यात आले आहे.