उरुळी कांचन येथील मोटारसायकलच्या भिगवण येथे झालेल्या अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी पाठविले..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : पुणे सोलापूर महामार्गावर मदनवाडी गावच्या हद्दीत मोटारसायकलच्या अपघातात चालकासह महिला गंभीर जखमी झाली. अपघात झालेला दिसताच तेथून जात असताना माजी राज्यमंत्री आणि इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी त्वरित आपली गाडी थांबवत अपघात ग्रस्तांना मदत करत तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठवून देवून माणुसकी जपली.
आमदार दत्तात्रय भरणे त्यांच्या कामानिमित्त जात असताना मदनवाडी गावच्या हद्दीत मोटरसायकलचा अपघात होऊन दोन जण जखमी होऊन पडल्याचे त्यांना दिसले. जखमी मध्ये एक महिला व वाहनचालक पुरुषाचा समावेश होता.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी तात्काळ आपली गाडी थांबवत त्या ठिकाणी त्वरित ॲम्ब्युलन्सला बोलावून जखमींना त्वरित रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. मोटरसायकलच्या अपघातात जखमी झालेले महिला व पुरुष हे उरुळी कांचन येथून पुणे सोलापूर महामार्गाने इंदापूरच्या दिशेने निघाले होते.