पुणे -महान्यूज लाईव्ह
जिल्ह्यातील उरुळी कांचन येथील या घटनेने पुरोगामी महाराष्ट्राला हादरवून सोडले. भाच्याने मामेबहिण प्रेमप्रकरणातून पळवून नेली, याचा राग मामा,मामीला एवढा आला की, त्यांनी थेट तो राग भाच्यांवर काढला. दोन भाचींना विवस्त्र करून त्याचे चित्रीकरण करून त्यांना मारहाण केली. पोलिसांनी या नराधमांवर गुन्हा दाखल केला आहे.
लोणीकाळभोर पोलिसांनी या प्रकरणी मामा नंदकुमार माटे, सुंदरबाई नंदकुमार माटे (रा. दत्तवाडी, उरळीकांचन, ता. हवेली) सागर गोपीनाथ जगताप (रा. सहजपूर ता. दौंड), बाळासाहेब पिंगळे, आरती बाळासाहेब पिंगळे( रा. नायगाव, ता. हवेली), रवी श्रीराम गोसावी( रा. उरुळी कांचन, ता हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला, दरम्यान दोन तरुणींना विवस्त्र केलेला व्हिडीओ पोलिसांनी हस्तगत केला असून त्या अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना हवेलीच्या माजी सभापती हेमलता बडेकर व इतरांना समजल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन या दोन तरुणींच्या बाजूने कैफियत मांडली व पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. पोलिसांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेत यामध्ये गुन्हा दाखल केला.
याप्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, नंदकुमार माटे याच्या मुलीशी त्याच्याच भाच्याचे प्रेमसंबंध होते. या प्रेमप्रकरणाला मामाचा विरोध होता. मात्र दोघे पळून गेले. याचा राग मामाने थेट भाच्यांवर काढला. दोन्ही भाचींच्या घरी जाऊन त्यांना विवस्त्र केले. त्याचा व्हिडीओ काढला. त्यांना मारहाण केली.
हेमलता बडेकर यांना माटे याच्या भाच्याने हा प्रकार कळवला व यात न्याय देण्याची विनंती केली., त्यावरून बडेकर यांनी पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर सहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास लोणीकाळभोर पोलिस करीत आहेत.
असली कसली प्रेम प्रकरणे?
आपला मामाच थेट आपल्या बहिणींना विवस्त्र करून त्यांच्या अब्रूची लक्तरे साऱ्या गावाच्या वेशीवर टांगतो, तरीही हा भाचा पुढे न येता आपल्यावरच अन्याय झाल्याचा कांगावा करतो याचाही राग परिसरातील नागरिकांमध्ये आहेच, मात्र मामाने केलेले कृत्य कंसमामापेक्षाही अति नीच पध्दतीचे असल्याचा संताप परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.