राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
पुणे ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या कालावधीत बंद झालेले पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत दौंड व यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल आणि लॉजवर पुन्हा वेश्याव्यवसाय सुरू झाल्याची चर्चा आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड व यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकी, चौफुला – वाखारी, बोरीभडक तसेच दौंड शहरातील हॉटेल आणि लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू होता. या हॉटेल आणि लॉजवर तत्कालीन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी धडक कारवाई करून सील ठोकून कारवाई केली होती.
मात्र पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची बदली होताच सील करण्यात आलेल्या हॉटेल आणि लॉजवर पुन्हा हा व्यवसाय सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर महामार्गावरील खडकी, चौफुला – वाखारी, बोरीभडक या गावांच्या हद्दीतील काही हॉटेल आणि लॉजवर नव्याने वेश्याव्यवसाय सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
दौंड – कुरकुंभ रोडवर दौंडच्या हद्दीत एका राजकीय व्यक्तीच्या हॉटेलवर राजरोसपणे वेश्याव्यवसाय केला जात आहे. तसेच बोरीभड येथील दोन लॉजवर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशाने पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी गुन्हे दाखल करून मोठी कारवाई केली होती.
मात्र या कारवाई झालेल्या लॉजवरच पुन्हा गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींनी वेश्याव्यवसाय सुरू केला आहे. याच ठिकाणी नाही, तर त्याच व्यक्तींनी चौफुला – वाखारी, खडकी व भिगवण येथील काही हॉटेल आणि लॉजवर हा व्यवसाय नव्याने सुरू करून या व्यवसायाचे जाळे भिगवण पर्यंत वाढवले आहे.
या व्यवसायात महिला व अल्पवयीन मुलींचा वापर केला जात असल्याचे चित्र आहे. लोकवस्तीत व सार्वजनिक ठिकाणी हा व्यवसाय सुरू असल्याने महिला वर्गात नाराजी व्यक्त केली जात आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील हॉटेल आणि लॉजवर दौंड व यवत पोलीसांच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे या व्यवसायाने महामार्गावरील हॉटेल आणि लॉजवर मोठे बस्तान बसवले असल्याचे चित्र आहे.
स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांना हाताशी धरून परप्रांतीयांनी हा व्यवसाय सुरू केल्याचे चित्र महामार्गावरील लॉज आणि हॉटेलवर पाहायला मिळते. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी लक्ष घालुन दौंड व यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत लॉज व हॉटेल यामध्ये सुरू असलेल्या अशा व्यवसायांवर कारवाई करून असे व्यवसाय तातडीने कायमस्वरूपी बंद करावेत अशी मागणी महिला वर्गाकडून होत आहे.