कोल्हापूर – महान्यूज लाईव्ह
नऊ महिन्याचं बाळ वॉकरवरून पळताना अचानक गव्हाच्या पिठाच्या भांड्यात पडलं.. आणि नाकातोंडात गेलेले गव्हाचे पीठ चिकटून त्याचा दुर्दैवी अंत झाला. ही हृदयद्रावक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे तालुक्यातील जुना वाशीनाका येथे घडली.
या घटनेत कृष्णराज राजाराम यमगर या नऊ महिन्याच्या बालकाचा करूण अंत झाला. या घटनेने सारा परिसर सुन्न झाला.
पोलिस सूत्रांकडील माहितीनुसार जूना वाशिनाका येथे सुप्रिया व राजाराम यमगर राहतात. त्यांचा नऊ महिन्याचा मुलगा कृष्णराज याला घेऊन सुप्रिया या वडणगे येथे आजीकडे गेल्या होत्या. तेथे कृष्णराज हा वॉकरवरून फिरता फिरता गव्हाच्या पिठाचे मोठे भांडे होते. त्यात तोल जाऊन पडला.
पीठ अधिक असल्याने त्याच्या नाकातोंडात पीठ गेले आणि श्वास घेण्याच्या प्रयत्नात ते चिकटून राहीले. त्यामुळे त्याचा जीव गुदमरला. त्याच्या आजीने त्याला लगेच या भांड्यातून बाहेर काढले व रुग्णालयात पळवले.
मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. बाळाचा जीव गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने यमगर कुटुंबियांनी एकच आकांत मांडला. परिसरही या घटनेने हळहळला.