विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : सध्याची राजकीय परिस्थिती बघता शिकलेल्या शिक्षकांनी शिकलेल्या पदवीधरांनी आणि राज्यातल्या शिक्षकांनी मग ते उत्तर महाराष्ट्रातले असतील, मराठवाड्यातील असतील, नागपूर विभाग, विदर्भातील असतील किंवा अमरावती विभागतील असतील, या सगळ्यांनी निकाल देताना कशा प्रकारचा निकाल दिला आहे, हे आपण पाहिलं आहे. आत्ताच्या राज्यकर्त्यांना डोळ्यात अंजन घालणारा तो निकाल आहे. फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण महाराष्ट्र फार काळ सहन करत नाही. अजून सर्वसामान्य जनतेच्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत.अशी टीका अजित पवार यांनी बारामती येथे एका खाजगी कार्यक्रमामध्ये केली.
वेगवेगळ्या मार्केट कमिटी आणि इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका लागायच्यात, पण जो शिकला सवरलेला आणि पुढची पिढी घडवण्याचं काम जो शिक्षक करत असतो, त्यांनीच अशा प्रकारचा कौल दिला आहे. सत्यजित तांबेना तिथे उमेदवारी दिली असती, वडिलांना काय आणि मुलाला काय; नवे चेहरे तर दिले पाहिजेत. तरुण मुलं चांगलं काम करत असतील तर का उमेदवारी द्यायची नाही? या मताचा मी होतो.
पण काँग्रेसने कोणाला उमेदवारी द्यावी हा सर्वस्व अधिकार त्यांच्या वरिष्ठांचा अधिकार होता. त्याच्यात लुडबुड करायचं मला काही कारण नव्हतं. कारण आम्ही महाविकास आघाडीला ती जागा सोडली होती आणि तसेच कोकणामध्ये देखील जे उमेदवार आता निवडून आलेले आहेत. ते म्हात्रे फॉर्म भरेपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत होते. त्यांना तिथे जागा मिळत नाही म्हटल्यावर त्यांना भाजपने घेतलं आणि तिकीट दिलं.
बऱ्याचदा भाजपला स्वतःच्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळण्याकरता योग्यतेचे उमेदवार ही त्यांच्याकडे नसतात हे दुर्दैव आहे. मग हा उमेदवार घे, त्याला बोलव, त्याला फोड, काहीतरी कर; अशा पद्धतीचं जे काही गलिच्छ राजकारण चाललंय त्याचा कुठेतरी एक जबाबदार नागरिक या नात्याने आपण विचार केला पाहिजे अशीही टीका अजित पवार यांनी केली.