तरुणाच्या खुनातील आरोपींना अवघ्या ३० तासांत भुईंज आणि एलसीबी पोलिस पथकाने केले गजाआड..!
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
खानापुर (ता.वाई) येथील अभिषेक जाधव या युवकाच्या खुनातील आरोपींना पकडण्यासाठी सातारा पोलिसांनी आपलं सारं कौशल्य पणाला लावलं आणि थेट रत्नागिरी गाठली. अत्यंत कसून तपास करत आणि अत्यंत सावधपणे त्यांनी सावजावर झडप घातली आणि पोलिसांनी अखेर त्यांना ताब्यात घेतलंच! 30 तासात खानापूरच्या अभिषेकच्या खुनातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णेबंदर येथे दोन दिवसांपासून भुईंज पोलिस ठाण्याचे सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, मोहिते आणि एलसीबीचे सचिन ससाणे, धिरज महाडीक हे सर्व वेषांतर करून होते. सापळा लावून बसले होते. त्या वेळी तपास कामातील तांत्रिक बाबींचा वापर करुन अखेर आज शनिवारी (दि. ४ रोजी) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी रहीम मुलाणी व प्रज्वल जाधव यांच्यावर झडप घालून त्यांच्या मुसक्या आवळण्यात अखेर यश आले.
सातारा जिल्हा व राज्यासह परराज्यातील गुन्हेगारांचे कर्दनकाळ असलेले भुईंज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांनी जिल्हा पोलिसप्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा तपास जलद गतीने करण्या साठी वरील पोलिस पथक तयार केले होते.
या तपास कामात जलद यश प्राप्त केल्याबद्दल जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, वाईच्या डिवायएसपी शितल जानवे खराडे, वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे, भुईंजचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे, आशीष कांबळे, महिला पिएसआय स्नेहल सोमदे यांचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले.
खानापुर गावातील एका गरीब कुटुंबातील अभिषेक रमेश जाधव (वय २०) याला त्याचाच मित्र असणारा रहीम मुलाणी आणि प्रज्वल जाधव यांनी २ फेब्रुवारी रोजी या दुचाकीवर जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण केले व परखंदी गावाच्या परिसरात निर्जनस्थळी एका शेतात नेले.
तेथे धारदार हत्याराने त्याच्या पाठीवर सपासप वार करुन त्याची हत्या करुन वरील आरोपींनी पलायन केले होते. या गुन्ह्याची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली होती.