राजेंद्र झेंडे महान्यूज लाईव्ह
दौंड : हरीण मारले तर किती मोठा गुन्हा घडतो हे सर्वांना माहित आहे, परंतु एका हरणाला वाचवण्याच्या प्रयत्नात एका युवकाचा जीव गेल्याची घटना दौंड तालुक्यात कुरकुंभनजिक शुक्रवारी रात्री घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राहुल बाळासाहेब लोंढे (वय ३६ वर्ष राहणार दौंड ता. दौंड जि. पुणे) असे या अपघातात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान ही घटना गुंजखिळ्यापासून काही अंतरावर असलेल्या फूड कंपनी जवळ हा अपघात झाला.
मृत राहुल बाळासाहेब लोंढे हे त्यांच्या भावासमवेत बारामतीहून दौंडला रात्री निघाले होते. बारामती कुरकुंभ रस्त्यावर पोहोचले असता रस्त्याला आडवे चिंकारा हरीण गेले. बारामती कुरकुंभ रस्त्याने जात असताना अचानक एक हरीण दुचाकीला आडवे आले.
त्या हरणाला वाचवताना दुचाकी धडकली आणि ते खाली पडले. या घटनेत हरिण तर वाचले, मात्र छातीला जबर मार लागल्याने राहुल हे गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या जखमी भावास दौंड येथील दौंड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे अशी माहिती दौंड पोलिसांनी दिली. पुढील तपास कुरकुंभ पोलीस करत आहेत.