खानापूरच्या परखंडी परिसरातील युवकाच्या हत्येअगोदर आरएम कंपनीकडून हत्यारांचे स्टेटस..
दौलतराव पिसाळ महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्याला हादरा देणाऱ्या खानापूरच्या युवक हत्या प्रकरणात काल दिवसभर एका स्टेटसची चर्चा होती. आरएम कंपनी नावाने रहिम व प्रज्वल यांच्या स्टेटसला अभ्या तू फिक्स असे नाव लिहून पिस्तूल, सत्तूराचे फोटो स्टेटसला ठेवले होते. त्यानंतर काही वेळातच अभिषेक जाधवची हत्या झाली.
खानापूरच्या या हत्याकांडाने परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. पूर्वीच्या काळी दरोडा टाकायचा असेल, त्या गावात किंवा घरी म्हणे एक चिठ्ठी यायची. आम्ही संध्याकाळी किंवा रविवारी दरोडा टाकणार असे त्यात नमूद केलेले असायचे. थोडक्यात त्या काळचा दरोडेखोर एवढा निर्ढावलेला होता की, त्याला खात्रीच असायची, काहीही धावपळ केली, तरी आपण दरोडा टाकणार.. त्यात ऐवज लांबवणार.. अगदी तसेच काहीसे आता होऊ लागले आहे.
खानापूर भागातील परखंडी परिसरात बांधकामात मजूरी करणाऱ्या अभिषेक या २० वर्षीय तरुणाचा खून झाला. या घटनेने परिसर हादरून गेला. घरी येऊन बोलावून नेऊन खून करण्यात आल्याची चर्चा या परिसरात आहे. थोडक्यात अगदी सांगून हा खून करण्यात आल्याने या खुनाचा निर्ढावलेपणा माणूसकीच्या सर्वच मर्यादा ओलांडणारा ठरला आहे.
या प्रकरणाला प्रेमप्रकरणाचीही झालर असल्याची चर्चा आहे, काहीही असले, तरी अशा प्रकारे जी दहशत पसरवली जात आहे, त्याचा उलगडा पोलिसांनी लवकरात लवकर करावा अशीच परिसरातील शांतताप्रिय ग्रामस्थांची इच्छा आहे. त्यामुळेच या घटनेतील आरोपी कधी सापडतात, त्यांच्याकडून कोणते गूढ पोलिस उकलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.