सार्वजनिक बांधकाम विभागाने इंदापूरच्या बाबा चौकात केलेल्या स्पीड ब्रेकरचा आठ दिवसांतच उडाला बोजवारा..! .. — इंदापूरच्या बाबा चौकात झालेले निकृष्ट व दर्जाहिन काम जनतेचे लक्ष वेधून घेतोय..!
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर – इंदापूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शहरातील बाबा चौक येथील केलेल्या स्पीड ब्रेकरचं काम म्हणजे ऐतिहासिक बनले आहे. आठच दिवसांत स्पीड ब्रेकर उखडले गेल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचा निकृष्ट व दर्जाहिन कामाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.केलेल्या स्पीड ब्रेकरने जनतेचे लक्ष वेधून घेतले आहे.
इंदापूर शहरातून जाणाऱ्या जुना पुणे – सोलापूर महामार्गावर वाहनांची मोठी वाहतूक दिसून येते. पोलीस स्टेशन जवळच असणाऱ्या बाबा चौक येथे वेगाने जाणाऱ्या वाहनामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे हा चौक धोकादायक बनला आहे.
अशा पार्श्वभूमीवर वेगाने जाणाऱ्या वाहनांचा वेग कमी व्हावा यासाठी स्पीड ब्रेकर व्हावा अशी मागणी झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने घाईघाईने बाबा चौकातील रस्त्यावर स्पीड ब्रेकर केले. मात्र सार्वजनिक बांधकामाची काम म्हणजे ‘लवली जाव टमकी बजाव’ या सर्वसामान्य वापरत असलेल्या वाक्याप्रमाणे झाली होती.
दुसऱ्याच दिवसापासून केलेल्या स्पीड ब्रेकरची खडी निघू लागली. खडी इतरत्र पसरल्याने दुचाकी वाहने त्या खडीवरून पुन्हा घसरू लागली. स्पीड ब्रेकरचे तीन तेरा झाले होते. एवढे होऊन ही उचकटलेली खडी लक्षात येऊनही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी डोळे झाकून आंधळ्याची भूमिका घेतली. मुळातच त्यांना दर्जात्मक कामे करायची इच्छा नव्हती . म्हणून त्यांनी दुरुस्ती करण्याची तसदी घेतली नाही.
सार्वजनिक बांधकाम विभागाची तालुक्यातील अनेक रस्त्यांच्या कामाच्या तक्रारी असतानाही त्यांच्यावर कसलीच कारवाई होत नसल्याने ठेकेदारांवर वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. अधिकाऱ्यांना हाताला धरून कामे होत असल्याने कुणी कितीही तक्रारी करा काहीच फरक पडला नाही.
त्यामुळे रहदारीचा मार्ग असणाऱ्या बाबा चौकात झालेला स्पीड ब्रेकर च्या कामाचा दर्जा खराब झाला, मात्र या अधिकाऱ्यांना या कामाचे कसलेच सोयरसुतक नाही. टक्केवारीमध्ये बरबटलेल्या बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधल्यास अधिकाऱ्यांची भाषा बदलते.
आपल्यावर राजकीय नेत्याचा हात आहे असे भासवत केलेल्या कामाकडे ते दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामावर जनतेचा विश्वास उडत आहे. साधे स्पीड ब्रेकरचे काम नीट करत नाहीत. स्पीड ब्रेकरची खडी डांबर निघून गेले तरीही समजदाधिकारी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून आहेत याचा अर्थ काय समजायचा?