दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई तालुक्यातील शांतता प्रिय असणाऱ्या खानापुर गावातील अभिषेक रमेश जाधव (वय २० वर्ष) याचा निर्घृण खून झाल्याने गावामध्ये संतापाचे वातावरण आहे.
अभिषेक जाधव याला काल संध्याकाळी खानापुर गावातीलच रहिवासी असलेल्या रहीम मुलाणी याने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चांदक गावातून बोलावून नेले. त्यानंतर थेट त्याचा मृतदेह परखंडी परिसरात सापडल्याने परिसरात संतापाची लाट उसळली. अभिषेक हा बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचे काम करतो.

ग्रामस्थांनी या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी गाव बंद ठेवून सकाळीच तातडीची ग्रामसभा घेतली. या गावात गुंडगिरी करणाऱ्या संबंधित लोकांना गावामध्ये प्रवेश देऊ नका. आता गावांमध्ये मुक्काम करण्यास ठेवायचे नाही, अशा प्रकारची महिलांनी देखील मागणी केली.


हा परिसर ठराविक लोकांच्या गुंडगिरीमुळे सातत्याने अस्वस्थ होत असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले आहे. खानापुर गावातील ही तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेत वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे व त्यांचे पथक खानापूर गावात दाखल झाले असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी काही पथके तैनात केली आहेत.