मुंबई – महान्यूज लाईव्ह
गेल्या काही वर्षांत राज्यात वाढलेली त्रिकोणी, चौकोनी कुटुंब पध्दती आणि आजीआजोबांकडून होणाऱ्या संस्काराचा अभाव याचा विचार करीत जुन्या पिढीचे महत्व नव्या पिढीला राहावे यासाठी राज्य शासनाने आजीआजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी दिवसही ठरला आहे. दरवर्षी १० सप्टेंबर हा दिवस आजीआजोबा दिवस म्हणून शाळांमध्ये साजरा केला जाईल.
यासंदर्भात आज राज्य शासनाने आदेश काढला असून जर १० सप्टेंबर रोजी एखादी शासकीय किंवा इतर कारणाची सुट्टी आली, तर त्याच्या पुढील एक दिवस म्हणजे ११ सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा करावा लागणार आहे.
या दिवसाच्या निमित्ताने मुलांनी आपापल्या आजीआजोबांची ओळख इतर मित्रांना करून द्यायची. आजीआजोबांच्या मनोरंजनासाठी या दिवशी नृत्य, संगीत, गायन, चित्रकला किंवा अगदी विटीदांडू, संगीत खुर्ची असे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत.
या दिवशी पारंपारिक वेषभूषेत आजीआजोबांना शाळेत बोलवायचे असून त्यांच्या या मनोरंजनात शिक्षकांनीही सहभागी व्हायचे आहे. महिलांसाठी मेहंदी तसेच अशाच वेगवेगळ्या उपक्रमांचेही आयोजन करता येणार आहे. आजींनी आजीबाईच्या बटव्याचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगावे अशीही यामागे संकल्पना आहे.
एकंदरीत आजीआजोबांचे घरात किती महत्व आहे, यापेक्षाही नातवांना आजीआजोबांचे महत्व समजलेच पाहिजे यासाठी सरकारचा अट्टाहास खरोखरच गोड आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये..राज्याचे सहसचिव ई.एम. काझी यांनी हा आदेश लागू केला आहे.