नायक बारामतीच्या समृद्धीचे
विक्रम शिवाजीराव जगताप व घनश्याम केळकर
आज देशभरात बारामती ओळखली जाते ती पवारांच्या नावाने. पवार आणि बारामती यांची ओळख एवढी घट्ट आहे की बारामतीत पवारांना विरोध करणारेही आहेत यावर या लोकांचा विश्वासच बसत नाहीत. पण बारामती परिसरातील लोकांना मात्र यातील सत्य परिस्थिती माहिती आहे. बारामतीत पवारांचे विरोधक आहेत आणि ते वेळप्रसंगी पवारांना ‘ जोर का झटका ‘ देण्याइतके सक्षम आहेत. पणदरे गावाने पवारांच्या विरोधकांना कायमच बळ देण्याचे काम केले आहे. पणदरे परिसरातील राजकीय गटांपैकी कोणता ना कोणतातरी गट आलटून पालटून पवारांच्या विरोधात जाताना दिसतो. आजच्या या लेखात आपण पणदऱ्यातील एक प्रसिद्ध राजकीय कुटुंबाचा तीन पिढ्यांचा कट्टर समर्थकापासून कट्टर विरोधक आणि पुन्हा एकदा समर्थनापर्यंतचा प्रवास पाहणार आहोत.
‘ एका पायावर उबा हाय ह्यो गडी ‘ असे सातारचे क्रांतीसुर्य नाना पाटील म्हणत असत. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही दिवसात आजारपणामुळे त्यांचा पाय कापावा लागला होता. पणदऱ्यात मात्र असे एक व्यक्तिमत्व होऊन गेले ज्यांनी आपले सगळे सार्वजनिक आयुष्य एका पायावर काढले. एक नैसर्गिक आणि एक कृत्रिम पाय अशा दोन पायावर त्यांनी दिल्लीपर्यंतचे दौरे केले. सहकारी साखर कारखाना उभारणीसाठी परिसरातील गाव आणि गाव पिंजून काढले. सार्वजनिक आयुष्यातील अनेक जबाबदाऱ्या त्यांनी खऱ्या अर्थाने एका पायावर पार पाडल्या. माळेगाव कारखान्याचे चेअरमनपद ही पणदरेकरांसाठी एक दुखरी आठवण आहे. आले आले म्हणता म्हणता अनेकदा या चेअरमनपदाने पणदऱ्याला हुलकावणी दिली. या कारखान्याच्या इतिहासात आतापर्यंत एकदाच पणदऱ्याला हे पद मिळाले, ज्यांनी हे भुषविले तोच हा एका पायावर उभा असलेला माणुस म्हणजेच श्रीरंगआण्णा कृष्णराव जगताप.
आण्णांचा हा पायही राजकारणाच्या धामधुमीतच त्यांना गमवावा लागला. स्वतंत्र भारतातील तेव्हाच्या मुंबई प्रांताच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरु होता. १९५२ सालच्या निवडणूकीत गुलाबराव मुळीक हे कॉंग्रेसचे बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते. श्रीरंगआण्णा कॉंग्रेसचे कार्यकर्ते म्हणून त्यांचा प्रचार करत होते. या प्रचारासाठी मोटारसायकलवरून जाताना अपघात झाला आणि त्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. त्यावेळी आवश्यक वैद्यकीय सुविधाही उपलब्ध नव्हत्या. पुढे अनेक वर्षे या पायावर उपचार झाले, पण या पायाला अपंगत्व आले ते आलेच. काही काळानंतर हा पाय दोन वेळेस कापावा लागला. त्यानंतर आण्णांनी जयपुर फुटच्या कृत्रिम पायाचा आधार घेतला आणि त्याआधारे आपली पुढची वाट चालायला सुरुवात केली.
पणदरे परिसरात सहकारी संस्थांची चळवळ त्यापूर्वीच रुजली होती. नीरा कॅनॉलच्या पाण्याचे शेतीला पाणी आले होते, ऊसाचे क्षेत्र वाढले होते आणि मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळेही सुरु झाली होती. बारामती, इंदापूरच्या सगळ्याच परिसरात त्यावेळी साखर कारखानदारी उभारण्याचा विचार सुरु झाला. छत्रपती, माळेगाव आणि सोमेश्वर हे तीनही कारखाने काही वर्षाच्या फरकाने सुरु झाले. पहिला सुरु झाला तो इंदापूर तालुक्यातील सणसरमधील छत्रपती साखर कारखाना. त्यानंतर आणि आपल्या परिसरातही सहकारी तत्वावरील साखर कारखानदारी आली पाहिजे असा विचार येथील पुढारी मंडळींच्या डोक्यात घोळू लागला होता.
या कारखान्याच्या प्रवर्तक मंडळात दत्तात्रय गणेश शेंबेकर, चेअरमन, गुलाबराव साहेबराव मुळीक – व्हा. चेअरमन. धुळाजी बाजीराव कोकरे, महादेव गेनबा तावरे, कृष्णाजी महादेव भोंगळे, दत्तात्रय सदाशिव करंदीकर, यांच्यासोबत श्रीरंगआण्णाही होते. १९५२ मध्ये आण्णांना अपघात झाला आणि १९५५ मध्ये या कारखान्याचे पहिले संचालक मंडळ अस्तित्वात आले. या मधल्या काळातील या कारखान्याच्या उभारणीसाठी करायवयाची सगळी धावपळ श्रीरंगआण्णांना आपल्या दुखऱ्या पायाने करावी लागली असणार असे निष्कर्ष काढायला काहीच हरकत नाही.
सहकारी साखर कारखाना काढण्याची पहिली अट म्हणजे सभासद भागभांडवल गोळा करणे. यासाठी गावागावात बैठका घेणे. लोकांना साखर कारखान्याची गरज समजावून सांगणे ही स्वाभाविक बाब होती. त्यावेळेस एका शेअरची किंमत ५०० रुपये होती. आज पाचशे रुपयाला फारशी किंमत नसली तरी त्याकाळी ही खुप मोठी रक्कम होती. लोकांनी घरातील दागिने विकून, दावणीची जनावरे विकून कारखान्याच्या सभासदत्वासाठीही ही रक्कम भरल्याचे अनेक दाखले आहेत. पणदरे परिसरात यासाठी शेतकऱ्यांना प्रेरीत करण्याचे काम धुळाबापू कोकरे आणि श्रीरंगआण्णांनी पार पाडले.
या कारखाना उभारणीच्या सगळ्या कामात संचालक म्हणून त्यांचा सक्रीय सहभाग राहिला. १९५५ ते ६० या काळाच्या संचालक मंडळात ते होतेच. त्यानंतर १९६० ते ६४ या काळात पहिले लोकनियुक्त संचालक मंडळ स्थापन झाले. त्यातही श्रीरंगआण्णा होतेच. त्यावेळी वीरसिंग जाधवराव चेअरमन तर शिवलिंग हिरेमठ हे व्हाईस चेअरमन होते. त्यानंतर १९६४ ते ६८ या काळात ६४ ते ६६ या काळासाठी त्यांनी माळेगाव कारखान्याचे चेअरमनपद भुषविले. माळेगाव कारखान्याच्या इतिहासात पणदऱ्याला ही एकमेव संधी मिळाली. अर्थाच हा सगळा काळ पायाभरणीचा होता. एक कारखाना उभा करणे आणि तोदेखील सहकारी तत्वावरील ही सोपी गोष्ट नसते. शेकडो माणसे शेकडो विचार मांडत असतात. प्रत्येकाचा आपपला स्वार्थ असतो, या सगळ्यांना बरोबर ठेवणे. पण निर्णय घेताना सार्वजनिक हिताचा विचार करणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. यामध्ये कीती अडचणी आल्या असतील, याची कल्पनाही आज आपण करू शकत नाही. पण तेव्हाच्या या मंडळींनी हे सगळे कष्ट उपसले आहेत, त्याआधारावर आजच्या सहकारी साखर कारखानदारीचे वैभव उभे राहिलेले आहे.
श्रीरंगआण्णांच्या चेअरमनपदाच्या काळात त्यांचे विश्वासू सहकारी होते हिरेमठ वकील. ते त्यावेळी माळेगावचे एमडी म्हणून काम करत होते. आण्णांचा स्वभाव अगदी सरळ होता. त्यांनी चेअरमनपद घेतानाच सांगितले की मला इंग्रजी येत नाही. त्यामुळे माझ्यापुढे ही इंग्रजीतील कागदपत्रे येतील, त्यावर मला त्यातील मजकूर न समजताच सह्या कराव्या लागतील. त्यामुळे माझ्या नावाला बट्टा लागेल असे काही करून त्यावर माझ्या सह्या घेऊ नका. हिरेमठ हे लिंगायत समाजाचे होते. त्यांनी गळ्यातील लिंगाची शपथ घेतली. आण्णा, तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, काळजी करू नका. हा विश्वास त्यांनी शेवटपर्यंत जपला. आण्णांनी कारखान्याचा कसलाच भत्ता घेतला नाही. हिरेमठ वकिलांनी ती रक्कम भारत फोर्ज कंपनीत गुंतवून आण्णांच्या नावे शेअर्स घेतले. आता त्या शेअर्सची किंमत कोट्यावधी रुपयांची झालेली आहे.
श्रीरंगआण्णा कट्टर कॉंग्रेस कार्यकर्ते, पण बारामतीच्या कॉंग्रेसमध्ये पुढे दोन गट झाले, त्यामध्ये त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या आर्शिवादाने उभ्या राहिलेल्या शरद पवार यांच्या गटामध्ये राहण्याचा ठरवले. याला यशवंतराव चव्हाणांशी असलेले त्यांचे संबंध कारणीभूत असावेत. आण्णांच्या पायाच्या दुखण्यात त्यांना पुण्याच्या मिलिटरी हॉस्पीटलमध्ये दाखल करणे आणि पुढे जयपूर फूट बसवणे या सगळ्यासाठी यशवंतराव चव्हाणांची मोठी मदत झाली होती. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांचे फाईंड असलेल्या शरद पवारांमागे त्यांनी आपली ताकद उभी केली. त्यावेळच्या काकडे आणि पवार गटाच्या संघर्षात कट्टर शरद पवार समर्थक म्हणून त्यांची ओळख होती.
शरद पवारांच्या माणसे जोडण्याच्या जगविख्यात शैलीचा अनुभव श्रीरंगआण्णा आणि त्यांच्या कुटुंबानेही घेतला. एका अधु पायावर प्रवास करण्यासाठी स्कुटर हे चांगले साधन होते. पण त्यावेळच्या लायसन्स राजच्या जमान्यात स्कुटर मिळणेही मोठी जिकीरीचे होते. त्यासाठी शरद पवारांनी शिफारस केली होती. त्या आधारे ही स्कुटर त्यांना मिळाली. एकदा शरद पवार पणदऱ्यात कार्यक्रमानिमित्त आले असताना या कार्यक्रमात श्रीरंगआण्णा असणार नाहीत असे त्यांच्या लक्षात आले. हा कार्यक्रम स्थानिक विरोधी गटाने घेतल्याने आण्णा त्या कार्यक्रमाला गेले नव्हते. पण शरद पवारांच्या ही बाब लक्षात येताच ते थेट त्यांच्या घरी गेले. त्यावेळी आण्णा जेवायला बसले होते. पवारसाहेब थेट तिथे गेले आणि मला सोडून जेवण चाललय का असे म्हणून थेट जेवायलाच बसले. तिथून ते श्रीरंगआण्णाना घेऊनच बाहेर पडले. कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांनी त्यांना सन्मानाने स्टेजवर बोलावून घेतले.
श्रीरंगआण्णा जोपर्यंत राजकारणात सक्रिय होते तोपर्यंत कट्टर पवार समर्थक होते. पण ज्यावेळी त्यांचे चिरंजीव प्रताप उर्फ पताभाऊ राजकारणात आले त्यावेळी मात्र त्यांचे पवारांशी बिनसले. त्यांच्यात ऐवढा दुरावा निर्माण झाला की पताभाऊंची सगळी राजकीय कारकीर्द पवारांच्या विरोधातच गेली. पताभाऊंनी पवारांना जेवढा कडवा विरोध केला तेवढा कोणत्याही पवारविरोधकाने केला नाही. माळेगाव कारखान्यावर पवार विरोधकांचा विजय झाला आणि त्यांचे संचालक मंडळ तिथे सत्तेवर आले. त्यानंतर हे सगळे संचालक एकदा दिल्लीला गेले. त्यावेळी पवारसाहेबांनी त्यांना जेवायला बोलावले. त्यावेळी त्यांचे हे निमंत्रण नाकारणारा एकमेव संचालक म्हणजे पताभाऊ होते. ते साहेबांकडे जेवायला गेले नाहीत. इकडे संघर्ष करायचा आणि तिकडे त्यांच्यासोबतच जेवायचे हे आपल्याला पटत नाही असे त्यांनी रोखठोक सांगून टाकले.
अजित पवार एकदा पताभाऊंना भेटण्यासाठी घरी आले. त्यावेळीदेखील ते त्यांना भेटले नाहीत. बराच वेळ थांबून अजितदादा निघून गेले. अजितदादांच्या सहयोग सोसायटीच्या बंगल्याची पायरी कधीच चढली नाही असा राजकीय कार्यकर्ता बारामतीत शोधून सापडणार नाही. पण पताभाऊ एकदाही तिथे गेले नाहीत.
अजितदादा स्वतः खासगीत बोलताना नेहमी असे म्हणत की, विरोधक असावा तर प्रताप भाऊंसारखा, ज्यांनी केवळ विरोधासाठी विरोध न करता जात-पात न पाहता सर्वसामान्य कष्टकरी शेतकर्यांच्याकरिता प्रामाणिकपणे कार्य केले. त्यामुळे कारखाना गेस्ट हाऊसवरती प्रताप भाऊंच्या अवतीभवती नेहमी सर्वसामान्य शेतकऱ्यांची गर्दी असायची
२००७ ते १४ च्या कारखाना बंडाच्या वेळी भाऊंकडे कोणीही जायला तयार नव्हते त्यावेळी माळेगावच्या शंकर नागरी पतसंस्थेचे संस्थापक येळे सरांनी पुढाकार घेतला आणि पहिली सही केली. तर स्वतः पताभाऊंनी आपल्या भूमिकेवर ठाम रहात कित्येक वर्षे दादांचे विरोधक असूनही अजितदादांच्या सोबतच राहण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि परिणाम स्वरूप कारखाना संचालकांनी केलेले बंड निःप्रभ झाले. याकामी त्यांचे सुपुत्र मंगेश पाटील जगताप यांनी महत्वाची भूमिका बजावली. एकदा मित्र जोडला तर त्याची मैत्री ते शेवटपर्यंत निभावत असतं. पताभाऊ हे अतिशय चांगल्या स्वभावाचे प्रामाणिक राजकारणी असल्याची आठवण येळे सरांनी सांगितली.
पण असे ऐवढे काय घडले की पवारगटाशी पताभाऊंचे असे वितुष्ट आले या प्रश्नाचे खरेखुरे उत्तर आपल्याला कधीच मिळणार नाही. दोन्ही बाजूने वेगवेगळी मते मांडली जातील आणि ती आपल्याला सत्यापासून फार लांब नेतील. पण एका कुटुंबातील तीन पिढ्यांचा वळणावळणाचा हा राजकीय प्रवास कसा घडत गेला ते पाहणे राजकारणाची जिज्ञासा असणाऱ्यांसाठी मोठे मनोरंजक असणार आहे. ते आपण पाहणार आहोत पुढच्या भागात
या लेखाबाबतच्या आपल्या प्रतिक्रिया आपण पताभाऊंचे चिरंजीव मंगेश जगताप यांना ७३८५०००००५ या क्रमांकावर कळवू शकता.
( या सदरात आपली माहिती प्रसिद्ध करण्यासाठी ९८८१०९८१३८ या क्रमांकावर संपर्क साधावा )